कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या 8 कोटींहून अधिक सदस्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. ‘ईपीएफओ3.0′ या नव्या सुधारीत प्रणालींतर्गत, आता पीएफधारकांना त्यांच्या खात्यातील पात्र रक्कम थेट यूपीआयद्वारे काढता येणार आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविय यांनी नुकतीच या सुविधेच्या यशस्वी चाचणीची माहिती दिली असून, ही सेवा लवकरच सर्वसामान्यांसाठी खुली होणार असल्याचे स्पष्ट केले.
सध्या पीएफचे पैसे काढण्यासाठी 7 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो. तसेच 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असल्यास मॅन्युअल पडताळणी करावी लागते. कागदपत्रांमध्ये किरकोळ चूक आढळल्यास क्लेम नाकारला जातो किंवा रखडतो. मात्र, ईपीएफओ3.0 मुळे ही संपूर्ण प्रक्रिया कागदविरहित होणार आहे. यात नियोक्त्याच्या मंजुरीची गरज नसल्यामुळे आठवड्यांचे काम अवघ्या काही सेकंदांत पूर्ण होणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरचे आर्थिक स्थैर्य जपण्यासाठी पीएफ खात्यातील 25 टक्के रक्कम नेहमी लॉक राहील. सदस्यांना त्यांच्या एकूण रकमेच्या 50 ते 75 टक्क्यांपर्यंतचीच पात्र रक्कम यूपीआयद्वारे काढता येईल. उमंग ॲपवर सदस्यांना ‘पात्र शिल्लक’ आणि ‘लॉक केलेली शिल्लक’ स्वतंत्रपणे पाहता येईल. आजारपण, शिक्षण, लग्न किंवा घरासाठी लागणारा निधी या सुविधेमुळे अवघ्या तीन दिवसांच्या आत किंवा अगदी तात्काळ बँक खात्यात जमा करता येईल.
या सुविधेचा लाभ कसा घ्यावा?
या डिजिटल सुविधेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. सदस्याचे यूएएन (यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर) सक्रिय असणे गरजेचे आहे. तसेच यूएएन सोबत पॅन आणि आधार कार्ड लिंक आणि पडताळणी केलेले असावे. पीएफ रेकॉर्ड आणि आधार कार्डवरील नाव तसेच जन्मतारीख यामध्ये कोणताही फरक नसावा, ती तंतोतंत मॅच होणे बंधनकारक आहे.