युनायटेड, इंटर मिलान उपांत्यपूर्व फेरीत दाखल

0
162

कोरोना महामारीच्या संकटानंतर मार्च महिन्यात स्थगित झालेल्या यूरोपा लीग फुटबॉल स्पर्धेला मंगळवारी उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याने पुन्हा सुरुवात झाली आहे. काल झालेल्या सामन्यांत मँचेस्टर युनायटेड आणि इंटर मिलान संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर जैव-सुरक्षित वातावरणात प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत यूरोपा लीगचे बुधवारी पुनरागमन झाले. बुधवारी झालेल्या लढतीत मँचेस्टर युनायटेडने लास्क लिंज संघावर २-१ अशी मात केली. त्यामुळे उपउपांत्यपूर्व फेरीच्या दोन्ही लेगमध्ये मिळून युनायटेडने ऑस्ट्रियाच्या क्लबविरुद्ध ७-१ अशी बाजी मारली. दुसर्‍या सत्रात लास्क लिंजने आक्रमक सुरुवात करताना ५५व्या मिनिटाला आपले खाते खोलले. फिलिप विसिंगरने संघाला १-० अशी आघाडी मिळवून देणारा हा गोल नोंदविला. लगेच दोन मिनिटांनी सीसी लिंगार्डने मँचेस्टर युनायटेडला १-१ अशी बरोबरी साधून दिली. तर अँथनी मार्शलने ८८व्या मिनिटाला गोल नांेंदवित मँचेस्टर युनायटेचा २-१ अशा विजयासह उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्‍चित केला.

दरम्यान, अन्य एका सामन्यात इंटर मिलानने गेटाफेवर २-० असा विजय मिळवीत अंतिम आठातील आपले स्थान निश्‍चित केले आहे. रोमेलू लुकाकूने ३३व्या मिनिटाला गोल नोंदवित मिलानला पहिल्या सत्रात १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. तर क्रिस्टियन एरिकसनने दुसर्‍या सत्राच्या अंतिम क्षणात ८३व्या मिनिटाला गोल नोंदवित संघाला २-० असा विजय मिळवून दिला.