यूएस ओपनच्या बक्षीस रकमेत कपात

0
145

यूएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या एकेरी विभागातील विजेत्यांना यंदा ८५०,००० यूएस डॉलर्स कमी बक्षीस रक्कम मिळणार असल्याचे स्पर्धेच्या आयोजकांनी जाहीर केले असून पहिल्या फेरीसाठीची बक्षीस रक्कम मात्र वाढवण्यात आली आहे. न्यूयॉर्कमध्ये ३१ ऑगस्टपासून सुरू होणार्‍या या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना मात्र प्रवेश नाकारण्यात आला आहे. मागील वर्षी स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम ५७ मिलियन डॉलर्स होती.

यंदा ही रक्कम ५३.४ मिलियन यूएस डॉलर्सपर्यंत कमी करण्यात आली आहे. पहिल्या फेरीतील बक्षीस रक्कम मात्र मागील वर्षीच्या ५८,००० डॉलर्सवरून ६१.००० डॉलर्सपर्यंत वाढवण्यात आली आहे. एकेरीतील विजेत्यांना ३ मिलियन डॉलर्सचे बक्षीस मिळणार आहे. मागील वर्षी हीच रक्कम ३.८५ मिलियन डॉलर्स होती.

उपविजेत्यांना १.५ मिलियन (मागील वर्षी १.९ मिलियन) मिळतील. उपांत्य व उपांत्यपूर्व फेरीत पराजित खेळाडूंची बक्षीस रक्कमही कमी झाली आहे. यूएसटीए, डब्ल्यूटीए, एटीपी यांनी कठीण काळात खेळाडूंना आर्थिक नुकसानीपासून वाचवण्यासाठी बक्षीस रकमेत मोठी कपात केलेली नाही, असे यूएसटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी माईक डॉस यांनी सांगितले आहे.