युगनायक

0
135

दीनदलितांच्या उद्धाराचा मार्ग खुला करून त्यांना उज्ज्वल भवितव्याची दिशा दाखवणार्‍या युगनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२५ वी जयंती आहे. शतकानुशतके उपेक्षेच्या आणि अवहेलनेच्या कर्दमामध्ये खितपत पडलेल्या दलित समाजाला त्याचा गमावलेला आत्मविश्वास मिळवून देऊन त्यायोगे सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे महत्कार्य डॉ. बाबासाहेबांनी केले. म्हणूनच आज त्यांच्या मृत्यूनंतर इतक्या वर्षांनीही संपूर्ण दलित समाज त्यांना आपले आराध्यदैवत मानतो. आचार्य अत्रे तर एकदा म्हणाले होते की, प्रत्येक अनुयायाचे ह्रदय हेच त्यांचे जिवंत स्मारक आहे. खरोखरच या भीमदीपाने या देशातील कोट्यवधी मने प्रज्वलित केली आहेत आणि पिढ्यान्‌पिढ्या हा दीप अशीच मने उजळवीत राहणार आहे. खरे तर सुधारणावादी सामाजिक परिवर्तनाचा पाया डॉ. आंबेडकरांपूर्वी महात्मा फुले, रानडे, लोकहितवादी, आगरकर अशा समाजसुधारकांनी घातला होताच. परंतु बाबासाहेबांनी एका उपेक्षित समाजाला खर्‍या अर्थाने नेतृत्व देऊन त्या कार्यावर कळस चढवला. दलित समाजाला दास्याच्या शृंखला त्यांनी खळखळा तोडायला लावल्या. नाना प्रकारच्या सामाजिक शोषणाविरुद्ध, बंधनांविरुद्ध प्रखर लढा पुकारला. खर्‍या अर्थाने दीनदलितांचा हा मुक्तिदाता तहहयात त्यासाठी झुंजत राहिला. किती विषम परिस्थितीतून त्यांनी हा समतेचा विचार रुजवला याची कल्पना केली तरी अंगावर काटा उभा राहतो. त्या काळच्या गावगाड्यातील प्रथा – परंपरांचे ओझे फेकून देणे हे सोपे काम नव्हते. ‘‘स्पृश्यांनी जिवंत म्हशीचे दूध प्यायचे आणि ती म्हैस मेल्यावर मात्र आम्ही मृत म्हशीला खांद्यावरून वाहायची. पण स्पृश्याघरची म्हातारी मेली तर तिला आमच्या खांद्यावरून का नेऊ देत नाहीत’’ असा सवाल उपस्थित करणार्‍या बाबासाहेबांपुढे तत्कालीन रूढीमार्तंडांनी ‘गुरेढोरे मेल्यावर त्यांची कातडी, शिंगे व हाडामांसापासून मिळणार्‍या पाचशे रुपयांना दलितवर्ग मुकतो आहे’ असे अजब तर्कट मांडले, तेव्हा ‘‘तुम्ही व तुमच्या नातेवाईकांनी हे काम करावे आणि तो पाचशे रुपयांचा फायदा मिळवावा’’ असे ठणकावून सांगण्यास बाबासाहेब कचरले नाहीत. दलित समाजाच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागल्या पाहिजेत, परंतु त्यानंतरही जर त्याला उच्च वर्गाची सेवाच करावी लागणार असेल तर या अभ्युदयाला काही अर्थ नाही हे बाबासाहेबांनी जाणले होते. त्यामुळे दलित समाजाची केवळ आर्थिक उन्नती हेच त्यांचे लक्ष्य नव्हते. आर्थिक उन्नती झाली पाहिजेच, पण मन सुसंस्कृत झाले पाहिजे. मनाचाही विकास झाला पाहिजे याबाबत ते आग्रही होते. स्वच्छता, शिक्षण यांचा त्यांनी आग्रह धरला होता. शतकानुशतकांच्या अवहेलनेतून मावळलेला उत्साह या समाजाला पुन्हा प्रदान करणे हे सोपे नव्हते. अनेक परंपरांच्या खोड्यामध्ये या समाजाचे पाय अडकलेले होते. या सार्‍या दास्याच्या शृंखला तोडून, त्यांच्यात नवा आत्मविश्वास फुंकण्याचे अजोड कार्य बाबासाहेबांनी केले. बाबासाहेबांकडे केवळ दलितोद्धारक नेता म्हणूनच पाहणे हा त्यांच्यावर अन्याय आहे. या देशाच्या संविधानाचा बळकट पाया घालण्यातील त्यांचे योगदानही तितकेच मौलिक आहे आणि या भक्कम पायावरच तर भारतातील लोकशाही आज नाना आव्हानांचा सामना करीत ठामपणे उभी आहे व वर्धिष्णू होत चालली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही या लोकशाहीच्या रथाची चार भक्कम चाके आहेत. बाबासाहेबांचे धर्मपरिवर्तन हा त्यांच्या जीवनातील एक खळबळजनक अध्याय होता. ‘मी हिंदू म्हणून जन्मलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी घोषणा त्यांनी केली, तिने मनुवाद्यांना हादरा दिला. समताधिष्ठित बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याची घोषणा त्यांनी केली, त्यामागे आपल्या पददलित समाजाच्या अभ्युदयाची आस होती. धर्मत्याग करण्यापूर्वी हिंदू समाजाचे ह्रदयपरिवर्तन करण्यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न करून पाहिला होता. परंतु ते सहजी घडणार नाही हे त्यांना कळून चुकले होते. बाबासाहेबांनी धर्मपरिवर्तन केले, परंतु राष्ट्रीयत्वाशी तडजोड केली नाही हे लक्षात घेणे जरूरी आहे. दुर्दैवाने आज कडव्या डाव्या नक्षली शक्ती, फुटिरतावादी, दलित शक्तीला आपल्याकडे वळवून घेण्याची शिकस्त करताना दिसत आहेत. विद्यापीठे या त्याच्या प्रयोगशाळा बनवल्या गेलेल्या दिसत आहेत, परंतु ज्या बाबासाहेबांनी या देशाच्या संविधानाचा पाया घातला, त्यांना हे कदापि मान्य झाले नसते. या देशाच्या उभारणीमध्ये जसे गांधी – नेहरूंचे योगदान आहे, तसेच बाबासाहेबांचेही आहे हे ऋण आपण कदापि विसरता कामा नये.