आर्थुर डिसिल्वा भाजपमध्ये

0
84

लुईस बर्जरप्रकरणी वादग्रस्त बनलेले मडगावचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आर्थुर डिसिल्वा यांनी काल भाजप प्रवेश केला. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रशासन पद्धत व कार्यक्षमता यामुळेच आपण भाजपकडे आकर्षित झाल्याचे डिसिल्वा यांनी सांगितले. पक्षाच्या उमेदवारीवर आपण दावा केलेला नाही. परंतु शुद्ध हेतूने कोणीही काही दिल्यास आपण त्याचा स्वीकार करीत असल्याचे डिसिल्वा यांनी सांगितले.
प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी डिसिल्वांनी पक्षाचा अर्ज भरल्याची पावती त्यांच्या हातात दिली व त्यानंतर उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी आर्थुर यांच्या भाजप प्रवेशाचे स्वागत केले. त्यांचा भाजप प्रवेश म्हणजे पक्षाला लाभदायक ठरेल, असे डिसोझा यांनी सांगितले. मडगाव किंवा अन्य भागात मोठा मेळावा आयोजित करून डिसिल्वा यांचे सुमारे १२०० समर्थक भाजप प्रवेश करतील, त्यात कुडतरी व अन्य मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा समावेश असेल, असे श्री. तेंडुलकर यांनी सांगितले.
लुईस बर्जर प्रकरणी आपला काहीही संबंध नाही. माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे विद्यमान आमदार यांना आपण आरटीआय ऊर्जा खालील माहिती आणून देण्याचे काम केले होते. एखाद्या पोस्टमन सारखेच ते काम होते, असे ते म्हणाले. या प्रकरणी आपल्यावर कुणाकडूनही दबाव आलेला नाही, असे त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. आपण कुणाच्याही दबावाला बळी पडणारा नाही, असेही ते म्हणाले.