युएईहून भारतात परतण्यासाठी पहिल्याच दिवशी ३२ हजार भारतीयांकडून नोंदणी

0
145

येथील ३२,००० हजारहून अधिक भारतीय नागरिकांनी भारतात परतण्याची इच्छा व्यक्त करून तशी तेथील भारतीय उच्चायुक्त कार्यालयात नोंदणी करण्याच्या प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी नोंदणी केली आहे.

बुधवारी रात्री अबूधाबी येथील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने वरील नोंदणी प्रक्रियेचा तपशील आपल्या वेबसाईटवर जाहीर केला. ही प्रक्रिया सुरू होऊन काही मिनिटांतच त्यात तांत्रिक बिघाड झाला. त्याविषयीचा ट्विट संबंधित अधिकार्‍यांनी काढून टाकला व पुन्हा गुरुवारी सकाळी नवीन पोस्ट टाकून त्यात गुरुवारी ५ वा. पर्यंत ३२,००० भारतीयांनी नावनोंदणी केल्याचे नमूद केले. दुबईतील भारताचे कौन्सल जनरल विपुल यांच्या हवाल्याने गल्फ न्यूजने हे वृत्त दिले आहे.

वेब पेजवर प्रचंड संख्येने एकाच वेळी नोंदणी सुरू झाल्याने दाब वाढला व तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. या तपशीलाचे विश्‍लेषण केले जात आहे. असे विपुल यांनी म्हटल्याचे वृत्तात नमूद केले आहे.

भारतात येऊ इच्छिणार्‍यांमध्ये अनेकांवर विविध आणिबाणीचे प्रसंग उद्भवले असून त्यात गर्भवती महिलांचाही समावेश आहे. ज्यांना तातडीने भारतात परतायचे असेल त्यांनी शक्यतो लवकर नावनोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. काही दिवस ही नोंदणी सुरू राहणार असून त्यानंतर संबंधित भारतीयांच्या प्रवासाबाबत संबंधित भारतीय राज्यांना कळविले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

सदर वेबसाईटवर नावनोंदणी झाली म्हणून सुरुवातीच्या विमान उड्डाणात आसन नक्की असल्याची हमी कोणाला दिली जाऊ शकत नाही. कारण अत्यंत आपत्कालीन स्थितीतील व्यक्तींनाच त्यासाठी प्राधान्य राहील असे विपुल यांनी म्हटले आहे.

संकटग्रस्त कामगार, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, वृद्ध व दुबई विमानतळावर अडकलेल्या व्यक्ती अशांना भारतात परतण्याच्या विशेष सेवेचा प्राधान्यक्रमाने लाभ दिला जाणार आहे असे विपुल म्हणाले.

प्रवासविषयक अटींसंबंधी अद्याप भारत सरकारकडून मार्गदर्शक तत्वे मिळालेली नसल्याने संबंधित अर्जदारांच्या कोविड-१९ स्थितीनुसार प्रवासाबाबत स्पष्ट झालेले नाही असे त्यांनी म्हटले आहे.

एअर इंडियाकडून ५०० विमानांची उड्डाणे व नौदलाची ३ युद्ध जहाजे या कामासाठी वापरली जाणार असल्याच्या वृत्ताविषयी विचारले असता त्याबाबत विपुल यांनी सांगितले की एअर इंडियाबाबत निश्‍चिती आहे. मात्र युद्ध नौकांबाबत माहिती नसल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, केरळ सरकारने गुरुवारी जाहीर केले आहे की २०१ देशांमध्ये राहणार्‍या ३,५३, ४६८ मल्याळी लोकांनी सरकारकडे भारतात येण्यासाठी नोंदणी केली आहे.