Home बातम्या या सम हा – अमोल

या सम हा – अमोल

0

प्रा. रमेश सप्रे

‘झाले बहू, होतील बहू, परि यासम हा’…ही अनेकवेळा वाचता येणारी शब्दरचना कधी बालगंधर्व, कधी लता मंगेशकर, कधी सचिन तेंडुलकर अशांसारख्या असामान्य, अलौकिक व्यक्तींच्या संबंधात आपण अनेकदा वाचतो किंवा वापरतो.

अमोल हा असाच एक अविस्मरणीय विद्यार्थी. याच्यासारखा हाच किंवा त्याच्यासारखा तोच! प्रवेशाच्या वेळी उड्या मारून काचेच्या पलीकडचं आपलं अस्तित्व जाणवून देत होता. इतर मुलं पाचवीत येताना साधारणपणे पार्टिशनच्या काचेतून दिसण्याएवढी उंच असतात. हा मात्र लिंबूटिंबू होता. लवकरच हेही लक्षात आलं की बुटक्या लोकांना आपल्या उंचीबद्दल एक न्यूनगंड (इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स) असतो तो अमोललाही होता. आणि अशा माणसांचं एक तंत्र(डिफेन्स मेकॅनिझम) असतं ते म्हणजे आपण कोणत्यातरी बाबतीत सर्वश्रेष्ठ (अन्‌कॉमन) आहोत हे सर्वांना दाखवणं.

नेपोलियन हा असाच ठेंगू होता. सैन्यातले इतर अधिकारी अधिक उंच असायचे. त्यांना रागवताना तो नेहमी ओरडायचा, ‘मी सांगतो तसंच झालं पाहिजे. नाहीतर तुझी सहा फूट उंची तुला वाचवू शकणार नाही.’ नेपोलियनच्या बोलण्यात असा दुसर्‍याच्या उंचीबद्दलचा उल्लेख आणखी एक प्रकारे येई, ‘यू मे बी टॉलर, बट रिमेंबर आय ऍम हायर!’ म्हणजे तू उंच असशील, पण मी उच्च आहे हे लक्षात ठेव.’ अमोलचं असंच होतं.

कुणाशीही त्याचं पटायचं नाही. सर्वांशी याचं शाब्दिक भांडण. शारीरिक झगडा शक्यच नव्हता इतका हा बारीक नि बुटका होता. यामुळे वर्गात याला शिक्षकांच्या टेबलाशेजारी फळ्याशी काटकोन (राइट अँगल) करून बसवलं जाई. बाकावर एकटाच. त्याला वाटे तो जणू कोणी राजा किंवा सम्राट आहे. एकदा अस्पृश्यतेबद्दल शिक्षकांनी वर्गात सांगितल्यावर एका विद्यार्थ्यानं त्याला विचारलं, ‘अमोल, तुला आम्हाला स्पर्श करणं कमीपणाचं वाटतं की तू स्वतः अस्पृश्य आहेस(अनटचेबल) म्हणून तुला वेगळं बसवलंय.’ ते वाक्य अमोलच्या जिव्हारी लागलं. येऊन म्हणाला की ‘मला इतर विद्यार्थ्यांच्या बरोबर बसवा, प्लीज! मी सर्वांशी जमवून घेईन.’ लगेच त्याची जागा बदलली. त्यानं तडजोड करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला फार यश आलं नाही.

दिवसांमागून दिवस सरत होते. अमोलची अभ्यासातली प्रगती चांगली होती. विशेषतः अनेकांना नावडणार्‍या गणितात त्याला खूपट गती होती. अनेकदा पूर्ण गुण मिळवायचा. तसा तो स्पष्टवक्ता व रोकठोक बोलणारा होता. खोटं बोलण्याची त्याला भयंकर चीड होती. लहान वयातच मोठ्या माणसांच्या भ्रष्टाचाराबद्दल तो जे बोलायचा ते विचार करण्यासारखं असायचं. कधी कधी तर एखाद्या द्रष्ट्यासारखे (प्रॉफेट) भविष्याचा वेध घेणारे उद्गार त्याच्या तोंडातून बाहेर पडायचे. गंमतीनं त्याला नॉस्त्रादेमस म्हणायचो. त्यावेळी चर्चा होती ‘मिलेनियम’ची. म्हणजे एकविसावं शतक सुरू होण्याची. दोन हजार साली ते सुरू होणार की दोन हजार एक साली? मोठमोठ्या शास्त्रज्ञात नि गणितज्ञातही मतभेद होते. याबाबतीत अमोलचं मत मोठं मजेदार होतं. शून्य ते नऊ असं दशक मानणार्‍या गटात तो होता. एक ते दहा हे दशक त्याला मान्य नव्हतं. कालगणना शून्य सालापासून सुरू झाली तरी म्हणताना आपण ‘एक जानेवारी शून्य’ म्हणणार की ‘एक जानेवारी एक’ म्हणणार? म्हणजे मोजताना ‘शून्य’ व म्हणताना ‘एक’… दोन्ही गटांचं म्हणणं एकच आहे… असं मत अमोल आग्रहानं मांडायचा नि म्हणायचा जे दशकाचं (डेकेड) तेच शतकाचं (सेंचुरी) नि तेच सहस्त्रकाचं (मिलेनियम)! त्याचं हे म्हणणं भल्याभल्यांना चक्रावून सोडी पण त्या म्हणण्यात काहीतरी दम होता हे निश्‍चित..

…तर असा हा अमोल! एका विचित्र प्रसंगातून कसा बाहेर पडला हे पाहण्यासारखं आहे. शिक्षकांनी असाइनमेंटसाठी विषय द्यायचे, संदर्भ (रेफरन्सेस) सांगायचे. मुलांनी ग्रंथालयातून ते संदर्भ वाचून, माहिती एकत्रित करून असाइनमेंट पूर्ण करायची. ही नेहमीचीच पद्धत. अमोलच्या वर्गाला एका विषयाची असाइनमेंट दिली गेली…मुलांनी विश्‍वकोशातून (एनसायक्लोपिडिया) माहिती जमवलीही. नंतर ग्रंथालयात गेलेल्या विद्यार्थ्यांना विश्‍वकोशातील संबंधित पानं कापलेली दिसली. ग्रंथपालामार्फत तक्रार आल्यावर वर्गशिक्षकानं, त्या विषयाच्या शिक्षकानं चौकशीही केली. पण ते कृत्य केलेल्या विद्यार्थ्याचं नाव काही कळेना. वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं, ‘विश्‍वकोशासारखे संदर्भ ग्रंथ आईसारखे असतात (मदर रेफरन्सेस)! त्यातली वीस पानं फाडणं म्हणजे आपणच आपल्या आईची वीसही बोटं कापण्यासारखं क्रूर कृत्य आहे. पश्चात्ताप होऊन कुणाला चूक कबूल करायची असेल तर जरूर करावी. शिक्षा होणार नाहीच.’…या सांगण्याचाही उपयोग झाला नाही. मन मात्र दोन दिवस अस्वस्थ राहिलं. अन् एक दिवस अमोल आला. हातात कसलं तरी रंगीबेरंगी कागदात गुंडाळलेलं प्रेझेंट. म्हटलं, ‘काय रे, आज माझा जन्मदिवस नाही. हे प्रेझेंट कुणासाठी?’ ‘शाळेसाठी सर!’ आश्‍चर्य वाटून विचारलं, ‘शाळेसाठी? अन् असं मान खाली घालून काय देतोयस?’

…अन् काय, अमोल हुंदके देत रडू लागला. म्हणाला, ‘ती पानं मी कापली होती. लिहून घेण्याचा आळस आणि आणखीही एक कारण…’ तो अडखळू लागला. ‘आणखी कारण कुठलं?’ असं विचारल्यावर तो आणखीनच रडू लागला. पाठीवर थोपटून शांत केलं. त्याला आश्‍वस्त केलं.. ‘नीट सांग सगळं. काहीही मनात ठेवू नकोस.’ यावर अमोल म्हणाला, ‘तो दुष्ट विचार होता. दुसर्‍या कुणाला ती पानं मिळू नयेत म्हणून ती कापली मी.’ ‘असू दे आता ते! पण ते हातात काय आहे?’ ती नीट कागदात बांधलेली भेटवस्तू टेबलावर ठेवून नमस्कार करत म्हणाला, ‘पहिल्यांदा कुणालातरी मनापासून नमस्कार करतोय. विश्‍वकोशाचा तो खंड ज्यातली पानं मी कापली, माझ्या काकांनी मुंबईहून आणलाय. तो ग्रंथालयात ठेवावा आणि हे पैसे त्या पानं फाडलेल्या ग्रंथाची किंमत! माझ्या पॉकेटमनीमधले आहेत ते पैसे.’ त्याला जवळ घेऊन हात फिरवत म्हटलं, ‘मला तुझा अभिमान वाटतो अमोल. आपण अविचारानं करु नये ती कृती केली. पण पश्‍चात्ताप होऊन त्या कृतीची ‘निष्कृती’ करणारी कृती अधिक विचार करून तू केलीस याचा मला अभिमान वाटतो. या पैशांची गरज नाही. तुझा आग्रहच असेल तर तूच या पैशातून नवी पुस्तकं घेऊन शाळेला भेट दे. पण काय रे हा एकच खंड विश्‍वकोशाचा कसा मिळाला?’ अमोल उत्साहानं बोलू लागला, ‘मुंबईला वजनावर मिळतात असले ग्रंथ. एकदोन वर्षापूर्वीची आवृत्ती (एडिशन) असते एवढंच. पण त्यानी काही फरक पडत नाही. कारण शाळातल्या असल्या संदर्भ ग्रंथांच्या आवृत्ती जुन्याच असतात ना?’ अमोलच्या या अमोघ तर्कशास्त्रावर काय बोलणार? यावेळी आठवीत होता अमोल. याचवर्षी आणखी एक घटना घडली.

हैद्राबादला बालचित्रपट महोत्सव होता. इतर ज्यूरींबरोबर बाल परीक्षकांचं मतही विचारात घेतलं जाणार होतं. सर्व राज्यातून हे बालज्यूरी निवडले होते. गोव्याचं प्रतिनिधित्व करणार्‍यांत अमोलची निवड झाली होती. अमोल रुबाबात गेला. त्याची मतं इतरांपेक्षा वेगळी असायची. पहिला कार्यक्रम अर्थातच उद्घाटनाचा. आंध्र प्रदेशचे त्यावेळचे मुख्यमंत्री उद्घाटक होते. कार्यक्रम खूप उशिरा सुरू झाल्याने आधीच भुकेजलेली मुलं कोमेजली होती. तशात सर्व स्थानिक वक्त्यांचे तेलगू इंग्रजीतले उच्चार. ‘एकविसाव्या शतकातील बालचित्रपट’ या विषयावर मुख्यमंत्री बोलू लागले. इतकं रटाळ व कंटाळवाणं होतं ते भाषण पण त्यावरची अमोलची प्रतिक्रिया मात्र मार्मिक होती. ती त्यानं आपल्या चित्रपट महोत्सव दैनंदिनीत लिहिली होती. ‘मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू झालं तेव्हा १९९९ साल होतं. ऐकताना मी (व माझ्यासारखे इतर अनेक) झोप आवरू शकलो नाही. ज्यावेळी उठलो तेव्हा एकविसावं शतक सुरू झालं होतं. मुख्यमंत्र्यांचं भाषण मात्र संपलं नव्हतं. ते चालूच होतं.’ – ही दैनंदिनी त्यातील प्रत्येक पाहिलेल्या चित्रपटाच्या परीक्षणांसह अमोलनं वाचून दाखवली. शिक्षकांना खूपच अंतर्मुख करणारी एका मुलाची ती अंतर्दृष्टी होती. आतली सृष्टी होती. असो.

अमोल शिक्षकांच्या नकला करण्याशी सहमत नसे पण शिक्षकांचं मूल्यमापन करण्याची त्याला सवय होती. बर्‍याच वेळा टिंगलटवाळीचं रूपही याला यायचं. याबद्दल सांगितलेलं त्याला पटायचं. तो म्हणायचा, ‘मी शिक्षकांबद्दल बोलताना अनुदार (अन्‌चॅरिटेबल) नसतो, पण वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) असतो. इंग्रजी शब्द अमोलचे. हो, त्याचं वाचन, इंग्रजी व इतर भाषांवरील प्रभुत्व चांगलं होतं.

याचा प्रत्यय अनेकदा येतच होता. त्याला आकार देण्याचं, साच्यात घालण्याचं आमचं काम सुरू होतं. बर्‍याच वेळी असा विचार मनात यायचा की का बसवायचं प्रत्येक मुलाला एका ठराविक आकारात? प्रत्येक मुलाचा प्रकार निराळाच असतो ना? संस्कारांच्या नावाखाली अप्रत्यक्ष मुलांचं बराकीकरण किंवा प्रमाणीकरण (स्टँडर्डायझेशन) केलं जातं का? इंग्रजीत वर्गाला जसं ‘स्टँडर्ड’ म्हणतात, तसंच ‘क्लास’ही म्हणतात ना? ‘मास’चा विचार करताना (उदा. मास प्रमोशन, मास कम्युनिकेशन) ‘क्लास’कडे दुर्लक्ष होतं का? – थोडं चिंतन केलं तर लक्षात येईल की थोड्याफार प्रमाणात हे असं घडतं खरं. वैचारिक पातळीवर स्वातंत्र्य देण्यासाठी चर्चा, भाषणं, वादविवाद, गटचर्चा, वाचनावर आधारित उपक्रम या सार्‍यांना नियोजनपूर्वक अधिक वेळ दिला पाहिजे. केवळ आचारावर (वागणुकीवर) भर न देता, विचारांची मुक्त अभिव्यक्ती अधिक महत्वाची मानली पाहिजे. अमोलच्या निमित्तानं असं विचारमंथन नित्य सुरू असे.

अमोलची सर्वांत अविस्मरणीय आठवण म्हणजे दहावीच्या मुलांना दिलेल्या ‘निरोप समारंभांत त्यानं केलेलं कविचा वाचन. विशेष परवानगी घेऊन त्यानं कविता वाचन करण्यापूर्वी सर्वांची (तमाम पालक व शिक्षकांची) क्षमा मागून कविता वाचनास सुरुवात केली. पिशवीतून एक कागदाचं मोठं भेंडोळं काढून ते हॉलच्या चारही भिंतीलगत मित्रांच्या सहकार्यानं उलगडले.

सर्वांना कुतुहल की अमोल कविता वाचतोय का जादूचे प्रयोग करणार आहे?… आणि अमोलनं आरंभ केला. ..‘..सातवीपर्यंत सारी गंमतजंमत होती. दिवस फुलपाखरी होते. आम्ही होतो मुलं. एप्रिलमध्ये लागला निकाल…वाटलं सुरू होईल आठवीची धमाल…पण कसलं काय नि कसलं काय? …नव्या वर्षाच्या (म्हणजे आठवीच्या) पहिल्याच दिवशी…उठवायला आली आई…जास्तच करु लागली घाई! ..नेहमीचं ‘बाळा ऊठ..ऊठ बाळा’ नाही..तर ऊठ आता तू घोडा झालायस आठवीतला! …‘हे काय नवीन?’ असं म्हणत उठलो…शाळेत पोचलो. पहिलाच पिरियड – वर्गशिक्षकाचा – ‘बी सिरियस. नाउ यू हॅव बिकम मॅच्युअर’ – हे पहिलंच वाक्य…मॅच्युअर म्हणजे काय हेच मुळात कळलं नाही.. म्हणून नक्की काय झालो हे कळलंच नाही…एकूण काय ‘घरी घोडा झालो’ अन् शाळेत मॅच्युअर! …या शब्दांना रोज ऐकून त्यांचा मळ साचला कानात..तिथून उतरला मनात!…मग काय मज्जाच मजा!..घरी आईबाबांचं ऐकूच यायचं नाही…म्हणून ऐकायचा प्रश्‍न नव्हता..आणि कानामनातल्या मळामुळे शाळेत शिक्षकांचं ऐकू यायचं नाही..म्हणून समजायचा प्रश्‍नच नव्हता. त्यामुळे सगळीकडे आनंद-महानंद-होता.. आनंदीआनंद! …

अमोलची आणखी एक कृती व स्मृती खूप शिकवून गेली. अंगात खूप ताप असल्याने ‘गणिताच्या पेपरला बसू नकोस’ असं म्हणणं आई-वडील-डॉक्टर सार्‍यांचं होतं… मी गणित बुद्धीनं सोडवणार..तुम्ही मंडळी मात्र मनःस्ताप देताय. शरीराचा ताप मनाबुद्धीला देणं चुकीचं आहे. हे अमोल सांगत होता. तो परीक्षेला बसला अन् पूर्ण गुण मिळवले. आहे किनई ग्रेट!

…तर अशा या अमोलनं आम्हाला खूप शिकवलं.

मुलांकडून चुका होतात. काही अनिष्ट कृती घडतात. त्यांना अपराध, गुन्हा वा पाप असे शिक्के न मारता सहानुभूतीनं समजावून देवून, त्यांच्या भावनांना आवाहन करून, त्यांच्या मनाला स्पर्श करून त्यांना सुधारायला हवं. ती निश्‍चित सुधारतील.

लहान मुलांकडे निरीक्षण – परीक्षणाची क्षमता असते. शिक्षक, पालक, विद्यार्थी, मित्र अशा सर्वांच्या कृतींचे ती परीक्षण करीतच असतात. पण याबरोबरच चित्रपट, पुस्तकं, नाटकं अशा प्रकारांचं परीक्षणही ती प्रभावीपणे करू शकतात.

मुलांच्या वाढीचं रुपांतर विकासात करणं हे पालक – शिक्षकांचं कर्तव्य आहे. त्यांना ‘घोडा’, ‘गाढव’ म्हणणं किंवा त्यांना परिपक्व होण्याच्या प्रक्रियेची (मॅच्युरिटी) कल्पना न देता नुसतंच ‘मॅच्युअर मॅच्युअर’ म्हणत राहणं चुकीचं आहे.

… काळाचा प्रवाह वाहतच असतो. उच्च शिक्षणाची योग्य शाखा निवडून, त्यात खूप चांगली प्रगती करून अमोल आता एक यशस्वी व्यावसायिक झालाय. एके काळचा लिंबूटिंबू आता सामान्य उंचीचा झालाय. गोव्यात व गोव्याबाहेरही यशस्वी होऊन राहिलाय. आमच्या मनात मात्र घर करून राहिलीय त्याची ती बटुमूर्ती नि लहानपणापासून दरवळू लागलेली कीर्ती !