यंदा बांदोडकर मार्गावर शिगमोत्सव चित्ररथ, रोमटामेळ मिरवणूक

0
8

>> पणजी स्मार्ट सिटीच्या कामांमुळे मार्गात बदल; समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांच्याकडून शिगमोत्सवाचा कार्यक्रम जाहीर

पणजी शिगमोत्सव समितीतर्फे सोमवार दि. 25 ते रविवार दि. 31 मार्चपर्यंत आझाद मैदानावर मराठी सुगमसंगीत, नाटक, हिंदी वाद्यवृंद, लावणी अशा विविधरंगी कार्यक्रमांसह यंदाचा शिगमोत्सव साजरा होणार आहे. पणजीत स्मार्ट सिटीचे काम सुरू असल्याने यावर्षी प्रथमच 18 जून मार्ग सोडून दयानंद बांदोडकर मार्गावरून चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य मिरवणूक निघणार आहे. जुन्या सचिवालयाकडून शनिवार दि. 30 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता या मिरवणुकीला प्रारंभ होईल व रात्री 10 पूर्वी कांपाल येथे ईएसजीकडे ती विसर्जित होईल. पणजी शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी काल पत्रकार परिषदेत पणजी शिगमोत्सवाचा तपशीलवार कार्यक्रम जाहीर केला. यावेळी कार्यकारी अध्यक्ष मंगलदास नाईक व सचिव शांताराम नाईक उपस्थित होते.

श्रीनिवास धेंपो यांनी सांगितले की, गावागावांत शिगमोत्सव साजरा होत होता. 1989 साली संस्कृतीप्रेमींचा एक गट उद्योगपती कै. वसंतराव धेंपे यांच्या अध्यक्षतेखाली एकत्र येऊन त्यांनी पणजी शिगमोत्सव समिती स्थापन केली आणि पणजीत चित्ररथ मिरवणूक घडवून आणली. त्याला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. पुढे त्याला राज्य उत्सवाचे रूप आले. यंदा पणजी शिग्मोत्सवाचे 36 वे वर्ष आहे आणि आमची समिती एकदिलाने, एकमनाने उत्सव साजरा करत आली आहे.

चित्ररथासाठी मंगलदास नाईक यांनी आपल्या मातोश्री श्रीमती पुतू नाईक यांच्या स्मरणार्थ, रोमटामेळसाठी किशोर नार्वेकर यांनी आपले बंधू कृष्णा नार्वेकर यांच्या स्मरणार्थ, तर लोकनृत्यासाठी सुनील अनंत नाईक यांनी आपल्या मातोश्री सुशिलाबाई नाईक यांच्या स्मरणार्थ फिरते चषक ठेवले आहेत.

सोमवारी गुलालोत्सव उधळणार
सोमवार दि. 25 रोजी आझाद मैदानावर सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत विविध जाती, धर्म, पंथ अशा सर्वांना एकत्र आणणारा गुलालोत्सव वाद्यवृंदाच्या तालावर खेळला जाणार आहे. सकाळी 9 वाजता श्री महालक्ष्मीला नमन करून मंदिराकडून रोमटामेळ वाजत गाजत आझाद मैदानाकडे निघेल.

विविधांगी कार्यक्रम
दि. 25 रोजी संध्याकाळी 7 वाजता नवोदित युवा कलाकारांचा स्वर साज कार्यक्रम, दि. 26 रोजी संध्याकाळी 7 वाजता महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीचे नृत्य, संगीताद्वारे दर्शन घडवणारा ‘रंगी रंगला महाराष्ट्र’ हा 65 कलाकारांचा भव्यदिव्य कार्यक्रम सादर होणार आहे व त्यात शिवराज्याभिषेक हे खास असेल. दि. 27 रोजी संध्याकाळी 7 वाजता कला चेतना वळवई व राजदीप नाईक प्रस्तुत ‘काणी नव्या युगाची’ हा नाट्यप्रयोग रंगणार आहे. दि. 28 रोजी संध्याकाळी 7 वाजता ओंकार मेलोडीज ऑर्केस्ट्रा सादर होईल.

दि. 29 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता निषाद क्रिएशन निर्मित ‘चांदणे स्वरांचे’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. समारोपा दिवशी दि. 31 रोजी संध्याकाळी 7 वाजता महाराष्ट्रातील ‘तुमच्यासाठी कायपण’ हा गाजलेला लावणी कार्यक्रम होईल, त्यात बालगंधर्व पुरस्कार विजेत्या नृत्यांगना पूनम कुडाळकर मुख्य आकर्षण असतील.

यंदा बक्षिसांच्या रकमेत वाढ
यंदा चित्ररथ, रोमटामेळ स्पर्धकांसाठी बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. पर्यटन खात्याच्या सौजन्याने यंदा साडे दहा लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येतील. चित्ररथासाठी प्रथम 75 हजार रुपये, द्वितीय 60 हजार रुपये, तृतीय 50 हजार रुपये, चौथे 45 व पाचवे 40 हजार अशी बक्षिसे असतील. शिवाय धेंपो उद्योग समूहातर्फे प्रथम तीन क्रमांकांना आणि रोमटामेळ विजेत्या तीन क्रमांकांना अनुक्रमे 15, 10 व 5 हजारांची बक्षिसे देण्यात येतील. रोमटामेळ स्पर्धेसाठी प्रथम 75 हजार रुपये, द्वितीय 50 हजार रुपये, तृतीय बक्षीस 40 हजार रुपये, चौथे 30 हजार रुपये व पाचवे 20 हजार रुपये अशी बक्षिसे आहेत. शिवाय उत्तेजनार्थ बक्षिसे, लोकनृत्य, वेशभूषा स्पर्धेसाठी वेगळी बक्षिसे आहेत.