राज्यात सलग तीन वर्षे जादा पावसाची नोंद झाल्यानंतर यावर्षी सुमारे १० टक्के कमी पावसाची नोंद झालीे. राज्यातील मोसमी पावसाचे प्रमाण सामान्य असून, राज्यात आतापर्यंत एकूण १०७ इंच पावसाची नोंद झाली.
राज्यात पावसाची तूट सुमारे ९.६ टक्के आहे. गतवर्षी २०२१ मध्ये पावसाचे प्रमाण त्या आधीच्या वर्षीच्या तुलनेत ५ टक्के जास्त नोंद झाले होते, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यात वर्ष २०१९, वर्ष २०२० आणि वर्ष २०२१ मध्ये जास्त पावसाची नोंद झाली आहे. वर्ष २०२० मध्ये आत्तापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे १६५ इंच पावसाची नोंद झाली. राज्यात वर्ष २०१७ आणि वर्ष २०१८ मध्ये कमी पावसाची नोंद झाली होती. राज्यातील मागील दहा वर्षातील पावसाची अंदाज घेतल्यास वर्ष २०१५ मध्ये आत्तापर्यंतची सर्वांत कमी म्हणजे ९४.०१ इंच पावसाची नोंद झाली होती.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत देशातील विविध भागात पावसाची शक्यता वर्तविली आहे. ऑक्टोबर महिन्यात सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात मागील २४ तासात दक्षिण गोव्यातील विविध भागात पावसाची नोंद झाली. काणकोण येथे सर्वाधिक १.६६ इंच पावसाची नोंद झाली. सांगे, केपे, मुरगाव, मडगाव, दाबोळी या भागात कमी प्रमाणात पावसाची नोंद झाली. उत्तर गोव्यातील पेडणे आणि वाळपई येथे काही प्रमाणात पावसाची नोंद झाली. म्हापसा, पणजी, फोंडा, जुने गोवे, साखळी या भागात पावसाची नोंद झाली नाही.