केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाढदिनी भरगच्च कार्यक्रम

0
17

>> नेत्रचिकीत्सा, मधुमेह शिबिरांचे आयोजन

केंद्रीय मंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांचा वाढदिवस मंगळवार दि. ४ ऑक्टोबर रोजी त्यांच्या सापेंद्र, रायबंदर येथील निवासस्थानी साजरा करण्यात येणार असून यानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वा. सुरू होणार्‍या शुभारंभी सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत. वाढदिनी केंद्रीयमंत्री नाईक संपूर्ण दिवस आपल्या निवासस्थानी चाहत्यांसाठी उपलब्ध असतील.

मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबीर
सदर दिवशी सकाळी ९ ते १०.३० या कालावधीत मधुमेह आणि रक्तदाब तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मधुमेह तपासणीसाठी येताना रुग्णांनी रिकाम्या पोटी येणे आवश्यक आहे. सकाळी ९ ते दुपारी १ या दरम्यान मोफत नेत्रचिकीत्सा आणि शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येईल. प्रसाद नेत्रालय सुपर स्पेशालिटी नेत्र रुग्णालय, उडुपी, नेत्रज्योती चेरिटेबल ट्रस्ट, उडुपी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजिण्यात आले आहे. निवडलेल्या गरजू रुग्णांना मोफत चष्मे देण्यात येतील. या शिबिराबरोबरच मोफत इसीजी व कार्डिओलोजी, बोन मिरनल डेन्सिटी तपासणी केली जाईल. भाजप वैद्यकीय विभाग, गोवा प्रदेशने या शिबिराची जबाबदारी सांभाळली आहे.

आयुर्वेद व होपिओपॅथी शिबीराचे आयोजन
या शिबिराला जोडून मोफत आयुर्वेद आणि होमिओपॅथी सल्ला आणि औषधांचे वितरण करण्यात येणार आहे. गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्र शिरोडा, श्री कामाक्षी होमिओपॅथी महाविद्यालय, शिरोडा आणि सांडू फार्मस्युटिकल्स यांच्या सहकार्याने या शिबिरांचे आयोजन, जनरल चेकअप आणि औषधांचे वितरण होईल. यावेळी औषधी वनस्पतचे वितरणही करण्यात येईल. संध्याकाळी ६.३० ते रात्री ९.३० या दरम्यान रचना क्रिएशन्स निर्मित ‘गाणी मनातली‘ हा बहारदार कार्यक्रम होईल. आयडिया सारेगम फेम अमोल आणि अभिषेक पटवर्धन व साथी कलाकार हा कार्यक्रम सादर करतील.

नेत्ररुग्णांसाठी खास सूचना
नेत्ररुग्णांसाठी विशेष सूचना करण्यात आल्या आहेत. या सूचनांनुसार शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या रुग्णांची त्याच दिवशी डॉक्टरांबरोबर हॉस्पिटलमध्ये जाण्याची तयारी असावी लागेल. हॉस्पिटलमध्ये जाणे-येणे, जेवणाची व राहण्याची मोफत सोय करण्यात येईल. शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात येणार्‍या रुग्णांनी आधारकार्ड, डीएसएसवाय कार्ड आणि मतदान ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. सदर रुग्णाने एखादा आरोग्य विमा उतरवला असल्यास त्याची कागदपत्रे सोबत आणावी, असे कार्यक्रमाचे आयोजक मातृभूमी सेवा प्रतिष्ठान, गोवातर्फे कळविण्यात आले आहे.