नगरनियोजन खात्यात २ हजार कोटींचा घोटाळा

0
11

>> विजय सरदेसाई यांचा सनसनाटी आरोप

गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख, फातोर्डा मतदारसंघाचे आमदार तथा माजी नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी काल पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत, राज्य सरकारने नगरनियोजन कायद्यातील १६ (ब) मधील दुरुस्ती रद्द करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याचे स्वागत केले. त्याचबरोबरच कलम १६ (ब) मधील दुरुस्तीचा फायदा उठवत राज्य सरकारने कोरोना महामारी काळात २ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही यावेळी सरदेसाई यांनी केला.

गोव्यातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी नगरनियोजन कायद्याच्या कलम १६ (ब) मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती आणि ती कायमस्वरूपी नव्हती, तर ज्या जमीनमालकांच्या निवासी विभागातील जमिनी चुकीने शेतजमिनी ठरवण्यात आल्या होत्या, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून अल्पकाळासाठी ही दुरुस्ती केली होती, असा दावा सरदेसाई यांनी केला.

राज्य सरकारने कोविड महामारीच्या काळात १६ (ब) दुरुस्ती अंतर्गत तब्बल १७ हजार जणांना त्यांच्या जमिनींचे निवासी विभागात रुपांतर करून दिले आहे. हे जमीन रुपांतर म्हणजे तब्बल २ हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप सरदेसाईंनी केला. हे विभाग बदलून देण्यात येत असताना कोणतीही पारदर्शकता नव्हती. या जमिनीचे फक्त सर्वे क्रमांक तेवढे जाहीर करण्यात येत होते; मात्र केवढ्या जमिनीचे रुपांतर करण्यात आले आहे, त्याचा तपशील सरकारने जाहीर केला नव्हता, असेही सरदेसाई म्हणाले.

२०१७ पूर्वी जेव्हा राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर होते, तेव्हा राज्यातील लोकांची सुमारे ८ कोटी चौरस मीटर एवढी निवासी विभागातील जमीन तत्कालीन सरकारने एका फटक्यात अनिवासी जमीन ठरवून लोकांवर मोठा अन्याय केला होता आणि लोकांवर झालेला हा अन्याय दूर करण्यासाठीच नगरनियोजन कायद्याच्या कलम १६ (ब) मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

आपण नगरनियोजनमंत्री पदावर असताना जमीन विभाग बदलून देण्यासाठी जमीनमालकांकडून पैसे घेऊन भ्रष्टाचार केला असता, तर आतापर्यंत एवढ्यात भाजप सरकारने आपल्याला तुरुंगात टाकले असते, असेही सरदेसाई म्हणाले.

आपण नगरनियोजनमंत्री असताना केवळ ३२ जणांना जमीन विभाग बदलून दिले होते. जुलै २०१९ पर्यंत आपण केलेले हे बदल जास्त करून धार्मिक संघटनांच्या जमिनीसंबंधीचे होते. दुसर्‍या बाजूला भाजप सरकारने कोविड काळात १७ हजार जणांच्या जमिनींचे निवासी विभागात रुपांतर करून २ हजार कोटींचा घोटाळा केला, असे विजय सरदेसाईंनी सांगितले.