म्हापसा अर्बनची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न

0
66

>> सर्वसाधारण सभेत माहिती

म्हापसा अर्बन सहकारी बँक ऑफ गोवाची सर्वसाधारण सभा गोंधळात व वादळी वातावरणात पार पडली. बँकेच्या सध्याच्या स्थितीला विद्यमान संचालक मंडळ जबाबदार असल्याचे आरोप भागधारकांनी सभेत करून संचालक मंडळाच्या राजीनाम्याची मागणी करीत प्रचंड गदारोळ घातला. जोपर्यंत सरकार मनावर घेत नाही तोपर्यंत बँकेची स्थिती सुधारणार नसल्याचेही आरोप यावेळी झाले. शेवटी बँक सुस्थितीत आणण्यासाठी तसेच रिझर्व्ह बँकेने बँकेवर लागू केलेले निर्बंध शिथिल करण्यासाठी प्रयत्न करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

बैठकीची सुरुवात २४ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या बैठकीच्या अहवालावरील चर्चेपासून झाली. राजसिंग राणे यांनी अहवालावर आक्षेप घेत गत सालच्या बैठकीच्या अहवालाद्वारे संचालक मंडळ बँकेचे रुपांतर पतसंस्थेत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. राजसिंग राणे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर अध्यक्ष गुरुदास नाटेकरांना योग्य उत्तर देता न आल्याने बँकेचे माजी अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांनी हस्तक्षेप करीत बँकेची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची तसेच रिझर्व्ह बँकेजवळ चर्चा सुरू असल्याची माहिती दिली. बँकेची नुकसानी कमी करण्याचे बंधन शिथिल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती खलप यांनी यावेळी दिली.

यावेळी सदस्य शशिकांत कांदोळकर यांनी बँकेचे पतसंस्थेत रुपांतर करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला बँकेकडून पत्र व्यवहार झाला किंवा नाही याची विचारणा केली. यावर नाटेकर यांनी उत्तर देताना गोवा बँकेचे इतर बँकेत विलिनीकरण करण्यासंबंधीच्या मुद्यावर विचार विनिमय सुरू असल्याचे सांगितले.
नाटेकर यांच्या उत्तरावर अनेक भागधारकांनी उठून संचालक मंडळावर आरोप करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.