म्हापसा अर्बनकडून 5 लाखांपर्यंतचे 99 टक्के दावे निकालात

0
8

>> बँकेचे लिक्विडेटर ॲन्थोनी डिसा यांची माहिती; 5 लाखांवरील दावे लिक्विडेशन प्रक्रियेच्या शेवटी निकालात

म्हापसा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने गुंतवणूकदारांचे पाच लाखापर्यंतचे 99 टक्के दावे निकालात काढले आहेत. तसेच, गुंतवणूकदारांचे पाच लाखांवरील दावे लिक्विडेशन प्रक्रियेच्या शेवटी निकालात काढण्यात येणार आहेत, अशी माहिती बँकेचे लिक्विडेटर ॲन्थोनी डिसा यांनी काल येथे एका पत्रकार परिषदेत दिली.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) एप्रिल 2020 पासून म्हापसा अर्बनला व्यवसाय करण्यास बंदी घालून गुंतवणूकदारांचे दावे निकालात काढण्यासाठी लिक्विडेटरची नियुक्ती केली होती. बँकेकडे सुमारे 33 हजार 570 गुंतवणूकदारांनी दावे दाखल केले. त्यातील 33 हजार 046 दावे निकालात काढण्यात आले असून, सुमारे 250 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. दावे दाखल केलेल्या केवळ 424 गुंतवणूकदारांचे दावे प्रलंबित आहेत. त्यातील 200 जणांनी अपुरी कागदपत्रे सादर केली आहेत, असे डिसा यांनी सांगितले. सुमारे 79 हजार 101 गुंतवणूकदारांनी दावे दाखल केलेले नाहीत. ही रक्कम सुमारे 30 कोटी रुपये एवढी होत आहे. त्या गुंतवणूकदारांना अनेक नोटिसा, स्मरणपत्रे पाठविण्यात आली आहेत. त्यातील 94 टक्के गुंतवणूकदारांची रक्कम ही 1 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. बँकेत गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना दावे दाखल करण्याची संधी अजूनही उपलब्ध आहे, असेही डिसा यांनी सांगितले.

बँकेत 1469 गुंतवणूकदारांनी सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. कायद्यानुसार लिक्विडेशन प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात त्यांचे दावे निकालात काढले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
बँकेने कर्ज वसुलीच्या प्रक्रियेला गती दिली आहे. बँकेचा परवाना रद्द करण्यात आला, त्यावेळी 2464 कर्ज प्रकरणे होती. त्यातील 1629 कर्ज प्रकरणे निकालात काढण्यात आली असून, 30 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. कर्जाची 835 प्रकरणे प्रलंबित आहेत. ही सर्व कर्जाची प्रकरणे न्यायालय किंवा अन्य ठिकाणी प्रलंबित आहेत. ही प्रकरणे निकालात काढण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, असेही डिसा यांनी सांगितले.

मागील वर्षभरात सुमारे 113 मालमत्तांची सार्वजनिक लिलावाद्वारे विक्री करण्यात आली असून, 20 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. साखळी, वास्को, कळंगुट, फोंडा, रेईश मागूश येथील बँकेच्या मालमत्ता, पर्वरी येथील एक घर, म्हापसा आणि सांतईनेज पणजी येथील शंभरच्या आसपास दुकानांचा लिलाव करण्यात आला आहे. बँकेच्या 200 कर्मचाऱ्यांची देय रक्कम देण्यात आली आहे. आता केवळ एकच जुना कर्मचारी कार्यरत आहे. बँकेची वसुली व देय प्रक्रिया पूर्ण करण्याच्या कामासाठी 20 कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आले आहेत, असेही डिसा यांनी सांगितले.