म्हापसानगरीतील गोवा राज्य विधानसभेतील लोकप्रतिनिधी जोसुआ पीटर डिसौझा

0
129

प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट

आपली ‘व्होट बँक’ तयार करण्यासाठी आमदार, नगरसेवक प्रयत्नशील असल्यानेच या बेकायदा प्रकारांना त्यांचे अभय मिळत असल्याची टीका नागरिक सर्‍हासपणे करताना दिसतात. नूतन आमदाराकडून अशा बेकायदा प्रकारांना आळा बसेल अशी नागरिकांची मनीषा आहे.

ख्रि. फ्रान्सिस्को डिसौझा हे म्हापसा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असताना त्यांचा वेगवेगळ्या सरकारमधील मंत्रिमंडळांत मंत्री म्हणून समावेश झाला होता. कै. मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्री. जोसुआ डिसौझा हे आपल्या पिताश्रींना त्यांच्या कामात त्यांना मदत करायचे. घरी आपल्या कामासाठी आलेल्या मतदारांची ऊठबस करण्याचे व त्यांची गार्‍हाणी ऐकून घेण्याचे काम जोसुआ करायचे. वडिलांकडून मिळालेल्या राजकीय मार्गदर्शनामुळे त्यांनी म्हापसा नगरपालिकेची दि. २५ ऑक्टोबर २०१५ रोजी झालेली निवडणूक पालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधून लढवून ते विजयी झाले होते. आजही ते म्हापसा पालिकेचे नगरसेवक म्हणून कार्यक्षमतेने कार्य करतात. कुटुंबातील राजकीय व सामाजिक वातावरणामुळे त्यांना गरीब, दीन आणि सर्वसामान्यांसाठी कार्य करायचं असून त्यांचे प्रश्‍न योग्य तर्‍हेने सोडवले जावेत असे त्यांना वाटते.

त्यांचे वडील ख्रि. फान्सिस्को डिसौझा यांच्या कारकिर्दीत भूमिगत गटार योजना, नवीन मासळी, भाजीपाला व मांसविक्री बाजारपेठेच्या इमारतीचे बांधकाम, चाचा नेहरू पार्क, भूमिगत वीजवाहिन्या, गणेशपुरी क्रीडामैदान, लोहिया गार्डन, दत्तवाडी गार्डन, म्हापसा पोलिस स्थानक आदी कामे म्हापसा मतदारसंघात पूर्णत्वास नेण्याचे कार्य केले होते. याशिवाय अस्मादिक आमदार व मंत्री असताना हाती घेतलेली व अपूर्ण राहिलेली कामे पूर्णत्वास नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, याचा याठिकाणी मुद्दाम उल्लेख करावा लागेल. अशाच प्रकारचे म्हापसानगरीच्या विकासाचे घेतलेले कार्य पुढे नेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हापशाचे नूतन आमदार जोसुआ यांनी करावे असे म्हापशातील नागरिकांना वाटते.

म्हापसा मतदारसंघाचे सातत्याने वीस वर्षे राज्यविधानसभेत प्रतिनिधित्व केलेेले व उपमुख्यमंत्रिपद तथा काही काळ म्हापसा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले ख्रि. फ्रान्सिस्को पेद्रू डिसौझा उपाख्य ‘बाबूश’ यांच्या दुर्दैवी निधनानंतर म्हापसा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत म्हापसा नगरपालिकेवर प्रभाग १३ मधून निवडून गेलेले त्यांचे व त्यांच्या पत्नी श्रीमती नेरी डिसौझा यांचे सुपुत्र श्री. जोसुआ पीटर डिसौझा हे आज त्यांचे वारसदार म्हणून गोवा राज्य विधानसभेत भाजपाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारात सामील झाले आहेत. तीस वर्षांचे श्री. जोसुआ डिसौझा हे गोवा राज्य विधानसभेतील सर्वात वयाने लहान असलेले युवा लोकप्रतिनिधी आहेत.

आमदार श्री. जोसुआ पीटर डिसौझा यांचा जन्म म्हापसानगरीत दत्तवाडी येथे दि. १२ नोव्हेंबर १९८८ रोजी झाला. इ.स. २००४ साली ते म्हापशातील सेंट ब्रिटोज हायस्कूलमधून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी त्यांच्या निवासस्थानाच्या मागच्याच बाजूला असलेल्या सेंट झेवियर महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची उद्योग व्यवस्थापन या विषयातील पदवी संपादन केली. तत्पूर्वी त्यांचे प्राथमिक शिक्षण खोर्ली येथील सेंट अँथनी या खाजगी प्राथमिक शाळेत झाले होते. त्यांचे आजोबा ख्रि. पेद्रू डिसौझा हे म्हापसा नगरपालिकेचे कर्मचारी तथा बार्देस कोमुनिदादीचे गावकार होते.
ख्रि. फ्रान्सिस डिसौझा यांच्या निधनानंतर म्हापसा मतदारसंघाच्या रिकाम्या झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. म्हापसा मतदारसंघाच्या या पोटनिवडणुकीसाठी मतदान दि. २३ एप्रिल रोजी होऊन भाजपाचे उमेदवार श्री. जोसुआ डिसौझा यांना विजयी घोषित करण्यात आले होते. या पोटनिवडणुकीत भाजपाचे श्री. जोसुआ डिसौझा यांना ११,१६७ मते मिळाली होती, तर त्यांचे नजीकचे कॉंग्रेस उमेदवार श्री. सुधीर कांदोळकर यांना १०,०१६ मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार व माजी म्हापसा पालिकाध्यक्ष श्री. आशिस शिरोडकर यांना ५०४ मते, गोवा सुरक्षामंचचे श्री. नंदन सावंत यांना २७९ मते, ‘आप’चे श्री. शेखर नाईक यांना २४३ मते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्री. संजय बर्डे यांना २०० मते, अपक्ष श्री. सुरेश हसोटीकर यांना ४२ मते आणि नोटा २८२ मते अशी मतविभागणी झाली होती.

म्हापसा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. जोसुआ पीटर डिसौझा यांनी आपल्या जाहीरनाम्यात म्हापसानगरीच्या विकासाची आश्‍वासने नागरिकांना दिली होती, त्यांतील महत्त्वाची आश्‍वासने खालीलप्रमाणे आहेत-
१) म्हापसानगरीचा सुनियोजित व सर्गांगीण विकास.
२) म्हापसा बसस्थानक, वाहनपार्किंगसाठी बहुमजली इमारत.
३) रवींद्र भवन, कला संग्रहालय, पार्किंग व्यवस्थेसह विविध कार्यक्रमांसाठी समाजसभागृह यांची उभारणी.
४) नगररचना योजनेंतर्गत म्हापसा शहरासाठी बोडगेश्‍वर प्लाझाची कार्यवाही.
५) तार नदीवर नवीन पुलाचे बांधकाम.
६) खोर्ली बायपास रस्त्याकडून निरवडे हमरस्त्यापर्यंत जाणार्‍या रस्त्याचे बांधकाम करणे.
७) करासवाडा जंक्शनकडील उड्डाणपुलाच्या बांधकामास गती देणे व रस्त्यांच्या मोक्याच्या जागी वाहतूक सिग्नल बसवणे.
८) वीजपुरवठा, पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून पाणीपुरवठा करणार्‍या टाक्यांचे बांधकाम करणे तसेच नवीन वीज ट्रान्स्फॉर्मर उभारणे यांसारखी कामे प्राधान्यक्रमाने हाती घेणे.
९) खोर्ली, कुचेली व मरड या भागांत क्रीडामैदानांचा विकास घडवून आणणे.
१०) शैक्षणिक संस्था, सरकारी कचेर्‍या, धान्य साठवण्याची सरकारी गोदामे यांचे दाट वस्तीच्या जागेतून इतरत्र स्थलांतर करणे.
११) शहरातील मोकळ्या जागांचा विकास करून त्या ठिकाणी जॉगिंग पार्कसारख्या सुविधा निर्माण करणे.
१२) कचरा विल्हेवाटीसाठी योग्य ती उपाययोजना करणे.
१३) कुचेली झरीचा व तार नदीच्या किनार्‍याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणे.
१४) कुचेली येथील हिंदू, मुसलमान व ख्रिस्ती समाजांसाठी स्मशानभूमी व दफनभूमीची योजना कार्यवाहीत आणणे.
१५) सध्याची पालिका गॅरेज, सिने अलंकार थिएटर आणि नगरपालिकेची जुनी इमारत यांसारख्या जागी उत्पन्न देऊ शकणार्‍या योजना राबवण्याची कार्यवाही करणे.
आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात आमदार श्री. जोसुआ डिसौझा हे म्हापसानगरीच्या विकासात प्राधान्यक्रमाने पुढील योजना कार्यवाहीत आणू इच्छितात.
१) खाजगी भागीदारीतून अंदाजे २१० कोटी खर्चून म्हापसा बसस्थानकाची उभारणी करणे.
२) शहर विकास योजनेंतर्गत रवींद्र भवनाची उभारणी, त्यासाठी जमीन ताब्यात घेण्याचे सोपस्कार सुरू करण्यात आले आहेत.
३) म्हापसा तार नदीवरील १० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार्‍या पुलाच्या निविदा काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर गेली अनेक वर्षे म्हापशाच्या नागरिकांना एक गोष्ट आजही सतावते आहे, ती म्हणजे, आमदार, मंत्री आणि नगरसेवक यांच्या आशीर्वादाने जागोजागी उभ्या राहिलेल्या बेकायदा झोपडपट्‌ट्या! कुचेली, एकतानगर व आजूबाजूचा परिसर, शेळपे, करासवाडा या भागांत उभ्या राहिलेल्या झोपड्या (झोपड्या नव्हे, तर पक्के बांधकाम केलेल्या बहुमजली इमारती), धर्मस्थळे या ठिकाणी वसतिस्थान करून असलेले बहुतेक लोक हे मजूर, बाजारपेठेतील किरकोळ भाजी विक्रेते हे सारे बिगरगोमंतकीय असून डोंगरतळाशी राहणार्‍या खोर्लीसारख्या भागावरील स्थानिक नागरिकांना याची झळ पोचते आहे. हे लोक मलमूत्र विसर्जनासाठी उघड्यावरच बसत असल्याने नागरिकांना रस्त्याने चालताना नाक मुठीत घेऊनच चालावे लागते. त्यामुळे स्थानिक नागरिकांत नाराजी असून आपली ‘व्होट बँक’ तयार करण्यासाठी आमदार, नगरसेवक प्रयत्नशील असल्यानेच या बेकायदा प्रकारांना त्यांचे अभय मिळत असल्याची टीका नागरिक सर्‍हासपणे करताना दिसतात. नूतन आमदाराकडून अशा बेकायदा प्रकारांना आळा बसेल अशी नागरिकांची मनीषा आहे.
नूतन आमदार म्हापसा मतदारसंघातून निवडून आल्यास अजून चार महिनेही पूर्ण झालेले नाहीत. एवढ्या अल्पकाळात त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणे आणि त्यांच्या कार्याचे विश्‍लेषण करणे योग्य होणार नाही. त्यांना कार्य करण्यासाठी अधिक वेळ मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आपणा सर्वांंनाच वाट पाहावी लागेल.