म्हादई प्रश्‍नी पुढील सुनावणी ३० रोजी

0
94

गोव्यातील म्हादईच्या पाण्याचा प्रवाह, पाण्याची उपलब्धता तसेच पाणी वळवण्याचा प्रयत्न झाल्यास गोव्यावर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतात याबाबतचा सविस्तर अहवाल गोव्याने वेळेवरच लवादाला सादर केला आहे. कर्नाटक व महाराष्ट्रालाही याबाबत अहवाल सादर करण्यात आलेला आहे. कर्नाटकाने लवादाकडे आपले म्हणणे सादर करण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. गोव्याने सादर केलेला पाणी साठ्याच्या उपलब्धतेचा अहवाल दिलेल्या वेळेत पूर्ण करून आपली जबाबदारी पूर्ण केलेली आहे. कर्नाटकाने वेळ मागितल्याने आता सुनावणी ३० ऑगस्टला ठेवण्यात आल्याची माहिती दिल्लीतून देण्यात आली. गोव्याची सुनावणीसाठी सर्व ती तयारी असून लवादाच्या सुनावणीची सर्व प्रकारची सज्जता गोव्याने केलेली आहे.

चेतन पंडित नवे साक्षीदार
जे ज्योती प्रकाश हे पहिले साक्षीदार म्हणून लवादासमोर होते. त्यांनी प्राथमिक स्तरावर बाजू मांडली होती व अभ्यासपूर्ण पध्दतीने उलट तपासणीला ते सामोरेही गेले होते. आता चेतन पंडित हे गोव्याचे साक्षीदार म्हणून लवादासमोर उभे राहणार असून त्यासाठी सर्व ती तयारीही केलेली आहे.
कर्नाटकाचे दबाव तंत्र भारताचे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी गोव्यातर्फे प्रभावी युक्तीवाद करत गोव्याला पहिला विजय प्राप्त करून दिल्याने या सुनावणीतून बाहेर ठेवण्यासाठी कर्नाटकाने जबरदस्त तयारी केली असून अतिमहनीय व्यक्तींना गुंतवून नाडकर्णी यांना गोव्याची बाजू लढल्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्याची चाल खेळली जात असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजले.