म्हादई : कर्नाटकाचे साक्षीदार बजाज यांची लवादासमोर माफी

0
128

म्हादई पाणीतंटा प्रश्‍नावर दिल्लीत जललवादासमोर सुनावणी सुरू असून कर्नाटकाचे साक्षीदार ए. के. बजाज यांची अनेक दिवस उलट तपासणी केल्यानंतर वारंवार प्रश्‍नांच्या भडीमारामुळे सतत गोत्यात आलेल्या बजाज यांना लवादासमोरच खोटारडेपणा उघड झाल्याने अखेर माफी मागावी लागली. गोसाईन व बजाज यांची साक्ष पूर्ण झाल्यानंतर कालपासून महाराष्ट्राचे साक्षीदार एम. हुदरार यांची उलट तपासणी सुरू झाली आहे. परवा कर्नाटकाच्या साक्षीदाराची उलट तपासणी करण्यासाठी महाराष्ट्राला संधी दिली देण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्राने उलट तपासणी घेण्यास नकार दिल्याने महाराष्ट्र व कर्नाटकाची म्हादई प्रश्‍नी मिली भगत असल्याचे उघड झाले आहे.
राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाअंतर्गत नद्या जोडणी जाहीर केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ऍड. आत्माराम नाडकर्णी यांनी साक्षीदार बजाज यांना या संदर्भात म्हादई व मलप्रभा नद्यांची जोडणी का नाही असा थेट सवाल केला होता. मोठ्याच नद्या जोडण्याचा समावेश असून लहान नद्या जोडण्यात येणार नसल्याचे साक्षीदाराने सांगितले. राष्ट्रीय जल आयोगाचे अध्यक्ष असूनही बजाज यांनी चुकीची माहिती दिल्याचे नाडकर्णी यांनी लवादाच्या नजरेस आणून दिले.
म्हादईचे पाणी वळवल्यास किती पाणी कृषी विकासासाठी वापरणार व पिण्यासाठी किती नियोजन करणार याचा तपशील देण्यास सांगितले असता बजाज निरुत्तर झाले होते. म्हादई मलप्रभेत वळवण्याचा जो प्रस्ताव आहे त्याचे काय नियोजन केले आहे व कोणता तोडगा आहे असा थेट सवाल केला असता साक्षीदार गडबडले. त्यावेळी लवादानेही बरेच फटकारले. यामुळे जोडणी प्रक्रियेबाबतही कर्नाटकाचे साक्षीदार बजाज यांचे अज्ञान लवादासमोर उघडे पाडण्यात गोव्याला यश आले आहे.