गोव्यात वादळाची शक्यता फेटाळली

0
90

>> वेधशाळेने केले स्पष्ट

गोव्यात वादळाची कोणतीही शक्यता नसून लोकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे काल पणजी वेधशाळेने स्पष्ट केले. पणजी वेधशाळेचे संचालक डॉ. साहू हे यासंबंधी बोलताना म्हणाले की, मान्सूनमध्ये कधीही वादळ येत नसते. मान्सूनच्यापूर्वी किंवा मान्सूननंतर वादळ येते.
पुढील २४ तासांत राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार असल्याचे साहू यांनी सांगितले. गेल्या २४ तासांतही काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पेडणे तालुक्यात गेल्या २४ तासांत तब्बल ७ इंच एवढा मुसळधार पाऊस झाल्याचे, तर त्या पाठोपाठ वाळपईत ३ इंच एवढा पाऊस झाल्याची माहिती त्यांनी दिली.
उद्यापासून पाऊस ओसरणार
उद्या काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता असली तरी परवा शुक्रवारपासून पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहितीही डॉ. साहू यांनी दिली. उद्या धोक्याचा इशारा नाही. मात्र, समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या काही भागांत उद्या जोरदार पावसाची शक्यता असल्याचे ते म्हणाले.