म्हादईप्रश्‍नी नव्याने न्यायासाठीच एनजीटीपुढे घेतली धाव ः सरदेसाई

0
114

म्हादईच्या प्रश्‍नावर आपणाला कोणतेही राजकारण करायचे नसून म्हादईप्रश्‍नी नव्याने न्याय मागण्याची वेळ आली आहे. म्हणूनच आपण राष्ट्रीय हरित लवादापुढे (एनजीटी) धाव घेतल्याचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसवा व आमदार विजय सरदेसाई यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

केंद्राने कर्नाटक सरकारच्या कळसा-भंडुरा या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानेच त्यावर स्थगिती आणण्यासाठी आपण एनजीटीत धाव घेतली आहे. आम्ही योग्य असेच पाऊल उचलले असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्याचे स्वागत करायला हवे होते, असे ते म्हणाले.
आपण उपमुख्यमंत्री असताना म्हादई प्रश्‍नी गप्प होतो हा मुख्यमंत्र्यांनी केलेला आरोप खरा नसल्याचे सांगून १४ ऑगस्ट २०१८ रोजी जेव्हा म्हादई जलतंटा लवादाने आपला निवाडा दिला होता त्याला जसे कर्नाटकने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते तसेच गोवा सरकारनेही दिले होते. तेव्हा जलसंसाधन खात्याचे मंत्री हे गोवा फॉरवर्ड पक्षाचेच नेते होते. त्यामुळे तेव्हा आम्ही काहीच केले नाही हा मुख्यमंत्र्यांचा आरोप खोटा असल्याचे सरदेसाई म्हणाले.