म्हादईप्रश्‍नी कर्नाटकविरोधात अवमान याचिका दाखल

0
262

गोवा सरकारने म्हादईचे पाणी बेकायदा वळविल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कर्नाटकविरोधात अवमान याचिका काल दाखल केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

म्हादईप्रश्‍नी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. म्हादईप्रश्‍नी न्यायालयात भक्कम बाजू मांडली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ट्विट संदेशात स्पष्ट केले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हादईचे पाणी बेकायदा वळविल्या प्रकरणी कर्नाटकविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची घोषणा सोमवारी केली होती. गोवा सरकारच्या जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंत्त्यानी ही अवमान याचिका दाखल केली असून कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवांना प्रतिवादी केले आहे.

कर्नाटकने म्हादईचे पाणी बेकायदा वळविल्याबाबतचे पुरावे, छायाचित्रे अवमान याचिकेत जोडण्यात आली आहेत. राज्य सरकारने यापूर्वी २०१८ मध्ये म्हादई प्रकरणी एक अवमान याचिका दाखल केलेली आहे.