म्हादईचे पाणी पिण्यासाठी द्यावे ः कर्नाटक

0
86

>> अमित शहांच्या निवासस्थानी पर्रीकर, येडीयुरप्पा, प्रकाश जावडेकरांची बैठक

म्हादईच्या पाणी वाटप प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी काल बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटकातील नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र पाण्याबाबत कोणतेही आश्‍वासन देण्यात आले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, अनंत कुमार, भाजप खासदार प्रल्हाद जोशी, कर्नाटकातील भाजपचे ज्येष्ठ नेते, तथा माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची उपस्थिती होती. या बैठकीत गोव्याने कर्नाटकला म्हादईचे पिण्यापुरते पाणी द्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

म्हादई नदीतील पाणी वाटपाबाबत म्हादई जललवादापुढे युक्तीवाद सुरू आहे. या युक्तीवादात कर्नाटकाची बाजू कमकुवत पडत असल्याने कर्नाटकातील नेत्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यामार्फत आता गोवा सरकारवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
कर्नाटकात विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने भाजपने म्हादईचा विषय हाती घेण्यासाठी प्रयत्न चालविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कर्नाटकातील विविध पक्षातील राजकीय नेत्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कर्नाटकासाठी पाणी देण्याची विनंती केली आहे. परंतु, गोव्याने म्हादईच्या प्रश्‍नावर ठाम भूमिका घेतल्याने कर्नाटकाला पाणी मिळू शकले नाही. दरम्यान, राजकीय इप्सीत साधण्यासाठी कर्नाटकाला मदत करण्याचा निर्णय झाल्यास तो गोव्याच्या भवितव्यासाठी धोकादायक ठरणार आहे. कर्नाटकात निवडणूका असल्याने ती राजकीय खेळी आखण्यात आल्याने मुख्यमंत्री पर्रीकर यांनी गोव्याचे हित जपण्यासाठी ठाम राहावे, अशी विनंती म्हादई बचाव अभियानचे सचिव राजेंद्र केरकर यांनी केली आहे.