म्यानमारमध्ये लष्करी कारवाईत ११४ निदर्शकांचा मृत्यू

0
139

म्यानमारमध्ये शांततेने निदर्शने करणार्‍या नागरिकांवर लष्कराच्या जवानांनी शनिवारी मोठी कारवाई करत एका दिवसात ११४ हून अधिक जणांना ठार केले आहे. या कारवाईत लष्करी जवानांकडून निदर्शकांच्या डोक्यावर आणि पाठीवर गोळ्या घालण्यात आल्या.
दि. १ फेब्रुवारी रोजी म्यानमारच्या सैन्याने नागरी सरकार उलथून टाकले आणि राज्य सल्लागार आंग सॅन सू की यांच्यासह नागरी नेत्यांना ताब्यात घेतले. त्यासोबतच वर्षभराची आपत्कालीन स्थिती जाहीर केली. यानंतर म्यानमारमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले असून निदर्शने सुरू आहेत. शनिवारी निदर्शनासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवर लष्करी जवानांनी गोळीबार करत ११४ जणांना ठार केले आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि म्यानमारमधील यूएनच्या कार्यालयाने या हिंसाचाराविरोधात खेद व्यक्त करत ही हिंसा थांबवावी असे आवाहन केले आहे.