म्यानमारमधील नागा दहशतवादी तळावर भारतीय सैन्याची कारवाई

0
100

>> अनेक दहशतवादी ठार झाल्याची शक्यता

भारतीय सैनिकांनी काल पहाटे म्यानमारमधील दहशतवादी तळांवर जोरदार कारवाई करून नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (खापलांग) या प्रतिबंधित संघटनेच्या अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे वृत्त आहे. पहाटे पावणे पाचच्या सुमारास झालेल्या या कारवाईत नेमके किती दहशतवादी ठार झाले याची माहिती उपलब्ध झाली नाही. भारतीय लष्कराचे या कारवाईत कोणतेही नुकसान झाले नसल्याचे लष्करी प्रवक्त्याने सांगितले.
प्रारंभी ही कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक असल्याचे वृत्त होते. मात्र तसे नसल्याचे स्पष्टीकरण लष्कराकडून देण्यात आले. भारतीय जवानांनी आंतरराष्ट्रीय सीमा पार करून कारवाई केली नाही. असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.
संबंधित वृत्तानुसार भारत-म्यानमार सीमेवर भारतीय जवानांची तुकडी गस्त घालत होती. यावेळी या तुकडीवर वरील संघटनेच्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. जवानांनी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याचे सांगण्यात आले.
वरील संघटनेचा खापलांग हा म्होरक्या असून तो म्यानमारमधील नागा नेता आहे. एनएससीएन (के) असे या दहशतवादी संघटनेला संबोधले जाते. जून २०१५ मध्ये मणिपूरमधील भारतीय लष्कराचे १८ जवान शहीद झाले होते. त्यामागे वरील संघटनाच होती हे सिद्ध झाले होते व त्यानंतर भारतीय लष्कराने या संघटनेवर कारवाई करताना त्यांच्या २० दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.