पंतप्रधान मोदी, अरुण जेटलींवर यशवंत सिन्हांची कठोर टीका

0
104

>> देशाची अर्थव्यवस्था रसातळाला नेल्याचा दावा

माजी केंद्रीय वित्तमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी काल एका राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्रातील आपल्या स्तंभलेखनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर कठोर टीका करताना विद्यमान सरकारच्या चुकीच्या आर्थिक निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था पार ढासळली असल्याचा दावा केला. नोटाबंदी व जीएसटी अंमलबजावणीच्या घाईमुळे देशाची अर्थव्यवस्था कधी नव्हे एवढी खालावली आहे असे सांगताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याची सिन्हा यांनी प्रशंसा केली. २०१९ साली लोकसभेसाठी निवडणुका होणार असून तोपर्यंत खालावलेल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणे शक्य नसल्याचा दावाही त्यांनी केला. जेटली यांनी देशाच्या अर्थ व्यवस्थेचे वाटोळे केल्याचे मत त्यांनी मांडले आहे.
सिन्हा यांच्या या परखड लेखासंदर्भात कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी तसेच माजी केंद्रीय वित्तमंत्री आदींनी मार्मिक टिप्पणी केली आहे. विशेष म्हणजे यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत सिन्हा हे मोदी मंत्रिमंडळात मंत्रीपदी आहेत.
आपल्या मतांशी भाजपमधील नेते कार्यकर्ते सहमत असले तरी पंतप्रधान मोदींना घाबरून कोणी बोलण्यास धजावत नाहीत. आपले हे मतप्रदर्शन म्हणजे आपले एक राष्ट्रीय कर्तव्य असे आपण मानतो. देशाच्या विद्यमान दुबळ्या आर्थिक स्थितीवर आपण भाष्य केले नाही तर राष्ट्रीय कर्तव्यात आपण कसूर केल्यासारखे होईल. भाजपमधील अनेक नेत्यांचीही विद्यमान वित्त स्थितीवर आपल्याप्रमाणेच भावना आहे. त्या सर्वांचे प्रतिबिंब आपल्या लिखाणात आले आहे असे त्यांनी नमूद केले आहे. चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे लाखो लोकांच्या नोकर्‍या गेल्या. ५० हून अधिक प्रमुख कंपन्या दिवाळखोरीच्या दिशेने गेल्या आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
आपल्या या लेखाचा शेवट करताना सिन्हा यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की आपण गरिबी, दारिद्य्र जवळून पाहिले आहे आणि आज त्यांचेच वित्तमंत्री अरुण जेटली संपूर्ण भारताला गरिबीचा अनुभव जवळून देण्यासाठी २४ तास काम करतात.
देशाची आर्थिक स्थिती बिघडण्यास फक्त नोटाबंदी कारणीभूत नसली तरी नोटाबंदीने ढासळलेल्या आर्थिक स्थितीच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले असे मत सिन्हा यांनी मांडले आहे. नोटाबंदी व जीएसटी हे देशाच्या आर्थिक मंदीतील सर्वात प्रमुख अडथळे ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे.