मोर्तझाच्या निवृत्तीची हीच योग्य वेळ ः गिब्सन

0
197

 

बांगलादेश क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी मश्रफी मोर्तझाने निवृत्ती स्वीकारण्याची ही योग्य वेळ असल्याचे काल सोमवारी म्हटले. ३६ वर्षीय मोर्तझाला २०२३ साली होणार्‍या संघात कोणतीही भूमिका नसल्याचे संकेत त्यांनी आपल्या वक्तव्याद्वारे दिले.
मागील वर्षी झालेल्या विश्‍वचषक स्पर्धेत मोर्तझा याला ८ सामने खेळून केवळ एक बळी घेता आला होता. वेळोवेळी त्याला निवृत्तीबद्दलचे प्रश्‍न विचारण्यात आले. परंतु, प्रत्येकवेळी त्याने आपल्यामध्ये अजून क्रिकेट शिल्लक असल्याचे सांगत निवृत्तीची गोष्ट टाळली. झिंबाब्वेविरुद्ध मायदेशात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या मालिकेत त्याने एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडले होते. गिब्सन पुढे म्हणाले की, मोर्तझाने निवृत्ती स्वीकारली तर ‘२०२३’ विश्‍वचषकापूर्वी तो नवीन भूमिका स्वीकारून बांगलादेश संघाच्या बांधणीसाठी योगदान देऊ शकतो. मुख्य प्रशिक्षक रसेल दुमिंगो हे नव्या दमाच्या खेळाडूंना घेऊन संघबांधणी करत आहेत, त्यामुळे मोर्तझा पुढील विश्‍वचषकापर्यंत तरेल याची शक्यता नाही. हसन महमूद, मोहम्मद सैफुद्दिन, शफिउल इस्लाम, इबादत हुसेन, तस्किन अहमद, खालिद अहमद, मेहदी हसन राणा सारखे जलदगती गोलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये विविध संघांचे कर्णधार वेगवान गोलंदाजांवर विश्‍वास ठेवत नाही. ‘अंतिम ११’मध्ये केवळ दोन स्पेशलिस्ट जलदगती गोलंदाज व तीन-चार स्पेशलिस्ट फिरकीपटू असतात. गडी बाद होत नसल्यास किंवा दुसर्‍या गोलंदाजाला झोडपल्यास लगेच कर्णधार फिरकी गोलंदाजाकडे वळतात. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना पुरेसा विश्‍वास दिला जात नाही. त्यामुळे परदेशात गेल्यावर वेगवान वातावरणात बांगलादेशी वेगवान गोलंदाजांची दिशा भरकटते, असे गिब्सन म्हणाले.