‘मोप’च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा

0
14

>> डिसेंबरमध्ये मोदींच्या हस्ते विमानतळासह आयुष इस्पितळाच्या उद्घाटनाची शक्यता

नागरी उड्डाण महासंचालकांनी पेडणे तालुक्यात नव्याने बांधण्यात आलेल्या मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाला नागरी वापरासाठी जीएमआर कंपनीला एरोड्रोम परवाना दिला आहे. त्यामुळे आता या विमानतळाच्या उद्घाटनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गोव्यात ८ ते ११ डिसेंबर २०२२ दरम्यान होणार्‍या जागतिक आयुर्वेद कॉंग्रेस आणि आरोग्य एक्स्पोच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याच दरम्यान, नवीन मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि धारगळ पेडणे येथील आयुष इस्पितळ या दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन एकाच वेळी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी धारगळ येथील आयुष इस्पितळाचे उद्घाटन ८ डिसेंबरला केले जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यावेळी मोप विमानतळाला आवश्यक विमान प्रवासी वाहतूक परवाना न मिळाला नव्हता. आता, जीएमआर कंपनीला विमानतळ वापरासाठी परवाना प्राप्त झाला आहे. तसेच, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळानेसुद्धा मोपा विमानतळाला आवश्यक परवाना दिलेला आहे. त्यामुळे आता मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ पहिल्या टप्प्यातील उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक करणार्‍या काही विमान कंपन्यांनी येत्या जानेवारी २०२३ पासून नवीन मोप विमानतळावरून उड्डाण करण्याचे जाहीर केले आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाची गेल्या ५ सप्टेंबर २०२२ रोजी यशस्वी चाचणी पूर्ण करण्यात आली. इंडिगो एअरलाइन्सचे एअरबस ३२० विमान हे पहिले व्यावसायिक विमान मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरते आणि उड्डाण केले.

रस्त्यांचे काम हाती
नवीन मोप विमानतळाच्या उद्घाटनामुळे धारगळ मुख्य रस्ता ते मोपा विमानतळापर्यंतच्या रस्त्याची सुधारणा, दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्यावर भूमिगत वीज वाहिनी घालण्यात आली असून नवीन पथदीप बसविण्यात येतआहेत. या विमानतळ मार्गावर आवश्यक ठिकाणी बस थांबे व इतर सुविधा उपलब्ध करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

एका बाजूने मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज होत असताना दुसर्‍या बाजूने दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वाबाबत चर्चा सुरू झाली आहे. मोपा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक आणि दाबोळी विमानतळावरून देशी विमान वाहतूक करण्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.