मोन्सेर्रात यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश

0
143

माजी मंत्री बाबुश मोन्सेर्रात यांनी पणजी विधानसभा पोट निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काल कॉंग्रेस पक्षात रीतसर प्रवेश करून अखेर घरवापसी केली. त्यांच्या प्रवेशाने आगामी निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या मताधिक्यात वाढ होण्यास मदत होणार आहे, असा दावा गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष तथा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गिरीश चोडणकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
मोन्सेर्रात यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी पणजी विधानसभा मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. महानगरपालिकेचे महापौर उदय मडकईकर, उपमहापौर पाश्कोला मास्कारेन्हस, समर्थक नगरसेवक, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी शक्तिप्रदर्शनात भाग घेतला.

मोन्सेर्रात यांच्या कॉंग्रेस प्रवेशाच्या वेळी विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, आमदार दिगंबर कामत, आमदार रवी नाईक, आमदार लुईझीन फालेरो, आमदार जेनिफर मोन्सेरात, आन्तोनियो फर्नांडिस, विल्फेड डिसा, फिलीप नेरी रॉड्रिग्स, नीळकंठ हर्ळणकर, क्लाफासियो डायस, आलेक्स रेजिनाल्ड, फ्रान्सिस सिल्वेरा आदींची उपस्थिती होती.

विकास आणि रोजगार हे दोन प्रमुख मुद्दे आहेत. मागील चोवीस वर्षांत पणजीचा विकास, पणजीतील युवकांना रोजगार सुध्दा उपलब्ध करण्यात अपयश आले आहे. भाजपचे मंत्री विश्‍वजित राणे, नीलेश काब्राल आपल्या खात्याच्या नोकर्‍या आपल्याच मतदारसंघातील लोकांना जास्त प्रमाणात देत आहेत. त्याच पद्धतीनुसार पणजीचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांना युवकांना रोजगार मिळवून दिला असता तर प्रत्येक घरात एकाला सरकारी नोकरी मिळाली असती, असा आरोप मोन्सेर्रात यांनी केला. पणजी पोट निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढविण्याचा निर्धार केला होता. परंतु, लोकांमध्ये विश्‍वासाचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने कॉंग्रेस पक्षात प्रवेश करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मोन्सेर्रात यांनी सांगितले.