मोन्सेरात यांनी त्यांच्यावरील खटल्यांची माहिती जाहीर करावी

0
147

>> भाजपची पत्रकार परिषदेत मागणी

पणजी पोट निवडणुकीतील कॉंग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी त्यांच्यावरील न्यायालयात प्रलंबित खटल्यांची माहिती जाहीर करावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते दामू नाईक यांनी पत्रकार परिषदेत काल केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवाराला त्याच्यावरील न्यायालयात प्रलंबित खटल्याची माहिती वृत्तपत्रातून जाहीर करणे बंधनकारक आहे. न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कॉंग्रेसचे उमेदवार मोन्सेरात यांनी खटल्याची माहिती जाहीर करावी, असे नाईक यांनी सांगितले.
निवडणूक प्रचाराची मुदत संपण्यापूर्वी कमीत कमी तीन वेळा उमेदवाराने आपल्यावरील प्रलंबित खटल्याची माहिती जाहिरातीच्या माध्यमातून वृत्तपत्रातून द्यायला हवी. कॉंग्रेसचे उमेदवार मोन्सेरात यांनी अद्यापपर्यंत खटल्यांची माहिती वृत्तपत्रातून जाहीर केलेली नाही. मोन्सेरात यांच्याविरोधात चार खटले न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. मोन्सेरात यांच्याविरोधात न्यायालयात प्रलंबित असलेले खटले गंभीर स्वरूपाचे आहेत, असा दावा भाजपचे प्रवक्ते नाईक यांनी केला.

तेव्हा भाजपला माहिती नव्हती?
भाजप आघाडी सरकारने गंभीर स्वरूपाचे आरोप असलेल्या मोन्सेरात यांची नव्याने स्थापन केलेल्या ग्रेटर पणजी पीडीएच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यावेळी भाजपला मोन्सेरात यांच्याविरोधात असलेल्या खटल्याची माहिती नव्हती का?या पत्रकारांच्या प्रश्‍नाचे भाजपचे प्रवक्ते नाईक समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. मोन्सेरात हे भाजपचे सदस्य नव्हते. घटक पक्षाचे सदस्य होते, असे मोघम उत्तर त्यांनी दिले.