मोन्सेरात यांच्यावर आरोप निश्‍चित करण्याचा आदेश

0
161

उत्तर गोवा जिल्हा न्यायालयाने पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यावर कथित बलात्कार प्रकरणी आरोप निश्‍चित करण्याचा आदेश काल दिला असून येत्या १२ जूनला मोन्सेरात यांच्यावर आरोप निश्‍चिती केली जाणार आहे. या प्रकरणातील पीडितेच्या सावत्र आई विरोधात आरोप निश्‍चित करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायाधीश शेरीन पॉल यांनी आमदार मोन्सेरात यांची कथित बलात्कार प्रकरणाच्या आरोपातून वगळण्याची याचिका फेटाळून लावली आहे. मोन्सेरात यांच्याविरोधात १२ जूनला बाल कायद्या अर्ंतगत बलात्काराचा आरोप निश्‍चित केला जाणार आहे. या प्रकरणातील महिलेच्या विरोधात गुन्ह्यात साथ दिल्याचा आरोप निश्‍चित केला जाणार आहे, अशी माहिती सरकारी वकील रॉय डिसोझा यांनी दिली.

जिल्हा न्यायालयाच्या या निवाड्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. वर्ष २०१६ मध्ये मोन्सेरात यांच्याशी हातमिळवणी करून आपणाला त्यांना विकल्याचा आरोप अल्पवयीन युवतीने तिच्या सावत्र आईवर केला होता. मोन्सेरात यांनी बलात्कार केल्याची तक्रार युवतीने महिला पोलीस स्टेशनवर नोंदविली होती. या कथित प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. महिला पोलीस विभागाने या प्रकरणी संशयित मोन्सेरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. त्यानंतर जुलै २०१८ मध्ये न्यायालयात मोन्सेरात याच्याविरोधात सुमारे २५० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या कथित प्रकरणी मोन्सेरात यांच्या आरोप निश्‍चिती संबंधीच्या याचिकेवर युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्ययालयाने निवाडा राखून ठेवला होता.
न्यायालयाने आमदार मोन्सेरात यांच्या वकिलांनी या प्रकरणी युवतीने दिलेल्या जबान्यांतील विसंगतीवरून मोन्सेरात यांच्या सुटकेसाठी केलेला युक्तिवाद फेटाळून लावला आहे. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर आमदार मोन्सेरात यांना आता प्रकरणाला न्यायालयात सामोरे जावे लागणार आहे.