>> शाहनवाज हुसेन यांचे प्रतिपादन
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने विकासावर भर दिलेला असून गोव्यातही विकासकामांना चालना मिळाली आहे. गोवा विकासकामांत कुठे मागे राहू नये. तसेच गोव्याच्या समृद्ध अशा संस्कृतीचे सर्वांना दर्शन घडावे यासाठीही केंद्र सरकारचे प्रयत्न चालू आहेत, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी काल येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेता म्हणून देशाने स्वीकारले असून त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट जनता गंभीरपणे रघेत असल्याचे हुसेन म्हणाले. केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे हे शेतकर्यांच्या फायद्याचेच असल्याचा दावाही हुसेन यांनी यावेळी केला. शेतकर्यांविषयी केंद्र सरकारला सहानभूतीच असून सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांसंबंधी ज्या सूचना केलेल्या आहेत त्यावर केंद्र सरकार अभ्यास करीत असल्याचे ते म्हणाले. शेतकरी हे आमचेच असून त्यांना चर्चेसाठीचे दरवाजे सरकारने बंद केले नसल्याचे त्यांनी सांगितले.
मोदींमुळेच कोविडची लढाई देश जिंकल्याचा दावाही हुसेन यांनी केला. अन्य देशांच्या तुलनेत भारताने कोविडविरूद्ध जो यशस्वी लढा दिला तो मोदी यांच्या सक्षम नेतृत्त्वामुळेच, असा दावाही शाहनवाज हुसेन यांनी यावेळी केला.
अन्य पक्षांतून येणार्यांना
भाजपची दारे खुली
अन्य पक्षांतून फुटून येणार्या नेत्यांना भाजप प्रवेश का देत आहे असे पत्रकारांनी विचारले असता ज्या ज्या कुणाला भाजपबरोबर येऊन देशाचा विकास साधायचा आहे त्यांना भाजपात प्रवेश दिला जात असल्याचे ते म्हणाले. विकासासाठी आमच्याशी हातमिळवणी करू पाहणार्यांना पक्षात यापुढेही प्रवेश दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.