मेळावलीप्रकरणी २३

0
194

>> दोघांना अटक, आज आणखी अटकेची शक्यता

शेळ मेळावली येथे बुधवारी पोलिसांनी ग्रामस्थांवर लाठी हल्ला करण्यास सुरुवात केल्यानंतर ग्रामस्थांकडून दगडफेक करण्यात आली. यात पोलीस आणि ग्रामस्थ जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी २३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर दोघांना अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल केलेल्यांना आज अटक होण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये कॉंग्रेसचे वाळपई गट समितीचे अध्यक्ष दशरथ मांद्रेकर, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर व इतरांचा समावेश आहे. पोलिसांनी आंदोलन करणार्‍यांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये विश्‍वेश परब व शैलेंद्र वेलिंगकर यांचा समावेश आहे.

अजून शंभर आंदोलनकर्त्यांना अटक होण्याची शक्यता असून त्यांच्या नावे अटक वॉरंट जारी होऊ शकते. त्यामुळे आज शुक्रवार दि. ८ रोजी मोठी धरपकड होण्याची शक्यता आहे.
गुळेली आयआयटी विरोधातील आंदोलकांनी काल गुरूवारीही शांततापूर्ण मार्गाने आपले आंदोलन सुरू ठेवले होते. बुधवारी झालेल्या पोलीस आणि आंदोलक यांच्यातील धुमश्‍चक्रीनंतर काल दिवसभर वाळपई येथे वाघेरी पोलीस ट्रेनिंग सेंटरकड़े सुमारे सातशे ते आठशे पोलिस तैनात केले होते. मात्र सकाळपासून मेळावलीवासीयांनी मुरमुणे या ठिकाणी जमून आपला विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले.

प्रकाश वेळीप यांनी घेतली भेट
दरम्यान, काल सकाळी गाकुवेधचे प्रकाश वेळीप व त्याच्या शिष्टमंडळाने मेळावली येथील आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. या भेटीत वेळीप यांनी लोकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्याचबरोबर किती नुकसान होते त्याचा आढावा घेतला.

आता माघार नाही
आंदोलकांनी पोलीस निरीक्षक सागर एकोसकर यांनी माफी मागावी यासाठी चोवीस तासांची मुदत दिली होती. ती मुदत काल संपली. त्यावर काय तो निर्णय आम्ही घेणारच आहोत. पण आमचे हे आंदोलन या पुढेही अशाच प्रकारे चालूच राहणार असून कोणत्याही परिस्थितीत आम्ही आता माघार घेणार नाही असे मेळावली पंचक्रोशी ग्राम बचाव अभियान समितीचे समन्वयक शशिकांत सावर्डेकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

मोर्चा स्थगित
मेळावलीवासीय काल संध्याकाळी वाळपई पोलीस स्थानकावर मोर्चा काढणार होते. परंतु यामध्ये बदल होऊन हा मोर्चा स्थगित करण्यात आला.

दिगंबर कामत मेळावलीत
काल गुरूवारी संध्याकाळी वाळपई पोलीस स्थानकात भेट देऊन विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मेळावलीत जाऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, स्वाती केरकर, वाळपई कॉंग्रेस अध्यक्ष दशरथ मांद्रेकर, नेते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पोलिसांवर कारवाई करा ः कॉंग्रेस
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली कॉंगेसने काल येथील पोलीस मुख्यालयावर मोर्चा नेऊन पोलीस महानिरीक्षक राजेश कुमार मीना यांना एक निवेदन दिले. यात बुधवारी आयआयटीविरोधात आंदोलन करणार्‍या महिलांना त्रास दिलेल्या पोलिसांवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी केली.

आंदोलकांशी चर्चा कराः कामत
मुख्यालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना दिगंबर कामत म्हणाले की दडपशाहीचा अवलंब न करता राज्य सरकारने आय्‌आय्‌टी प्रकल्पाला विरोध करणार्‍या शेळ मेळावली येथील ग्रामस्थांशी संवाद साधावा व तेथील जनतेला जर आपल्या गावात हा प्रकल्प नको असेल तर तो सरकारने अन्य ठिकाणी हलवावा असा सल्ला दिला.

पोलीस मुख्यालयावर मोर्चा
तत्पूर्वी काल दुपारी ३ च्या सुमारास शेळ मेळावली प्रकरणी कॉंग्रेस पदाधिकार्‍यांची दिगंबर कामत व गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. बैठकीनंतर कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकत्यांनी पोलीस मुख्यालयावर मोर्चा नेला.

मेळावलीत आयआयटी उभारणारच ः मुख्यमंत्री
शेळ मेळावलीत आयआयटी संकुल उभारण्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला.
शेळ मेळावली येथील नियोजित आयआयटी संकुलाला स्थानिकांचा विरोध कायम आहे. आयआयटी संकुलाच्या जमीन आरेखनाला ग्रामस्थ विरोध करीत आहेत. बुधवारी मेळावली येथे हिंसाचाराची घटना घडली होती. या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी, शेळ मेळावली येथे आयआयटी संकुल उभारले जाणार आहे. कुणालाही कायदा हातात घ्यायला मिळणार नसल्याचे म्हटले आहे.

गुन्हा अन्वेषण विभागाकडे प्रकरण
वाळपई पोलिसांनी शेळ मेळावली येथील हिंसाचारप्रकरणी ग्रामस्थांच्या विरोधात दाखल केलेला गुन्ह्यांचे प्रकरण चौकशीसाठी गुन्हा अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. पोलीस महासंचालक मुकेशकुमार मिना यांनी सदर प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी २३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा अन्वेषण विभागाकडून शेळ मेळावली येथील नागरिकांच्या आंदोलनात सहभागी झालेल्यांना राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांना चौकशीसाठी बोलावून घेतले जात आहे.