दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २९ जुलैपासून खेळविण्यात येणार्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका संघाचे नेतृत्व अँजेलो मॅथ्यूजकडे सोपविण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात मॅथ्यूजची मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार म्हणून पुन्हा निवड करण्यात आली होती. परंतु, सातत्याच्या दुखापतीमुळे त्याच्या अनुपस्थितीत दिनेश चंदीमलने संघाचे नेतृत्व सांभाळले होते.
निलंबनामुळे चंदीमलला पाचपैकी चार सामन्यांत खेळता येणार नसल्याने त्याच्याजागी मॅथ्यूजला पुन्हा कर्णधार करण्यात आले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केलेला डावखुरा फिरकीपटू प्रभात जयसूर्या याचा अपवाद वगळता संघात नवीन चेहर्यांना स्थान मिळालेले नाही. दुष्मंथ चमीरा, असेला गुणरत्ने, नुवान प्रदीप, दनुष्का गुणथिलका, शेहान मधुशंका व वानिदू हसारंगा यांना डच्चू देण्यात आला आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत चमकलेल्या कासून रजिता याला निवडण्यात आले आहे. अष्टपैलू शेहान जयसूर्या व दासुन शनका यांचे पुनरागमन झाले आहे.
श्रीलंका संघ ः अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनका, कुशल परेरा, धनंजय डीसिल्वा, उपुल थरंगा, कुशल मेंडीस, थिसारा परेरा, निरोशन डिकवेला, सुरंगा लकमल, लाहिरु कुमारा, कासुन रजिता, अकिला धनंजया, प्रभात जयसूर्या, लक्षन संदाकन व शेहान जयसूर्या.