कसोटीत अँडरसन अव्वल

0
71

भारताविरुद्ध १ ऑगस्टपासून सुरु होणार्‍या कसोटी मालिकेपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिला क्रमांक मिळविला आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत केवळ ८ बळी घेतलेल्या कगिसो रबाडाची दुसर्‍या स्थानी घसरण झाली आहे. रबाडाचे ८८२ तर अँडरसनचे ८९२ गुण झाले आहेत. भारताचा डावखुरा फिरकीपूट रवींद्र जडेजा तिसर्‍या, दक्षिण आफ्रिकेचा स्विंग गोलंदाज व्हर्नोन फिलेंडर (८२६) चौथ्या व भारताचा ऑफ ब्रेक गोलंदाज रविचंद्रन अश्‍विन पाचव्या क्रमांकावर आहे. जडेजा व अश्‍विनचे अनुक्रमे ८६६ व ८११ गुण आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत सपाटून मार खावा लागलेल्या दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकीपटू केशव महाराज याने दुसर्‍या कसोटीतील १२ बळींच्या जोरावर पाच स्थानांची सुधारणा करत १८व्या क्रमांकासह ‘टॉप २०’मध्ये प्रवेश केला आहे. श्रीलंकेचा ४० वर्षीय फिरकीपटू रंगना हेराथने न्यूझीलंडच्या नील वॅगनरला पछाडत आठव्या क्रमांकावर हक्क सांगितला आहे.

फलंदाजांचा विचार करता श्रीलंकेचा सलामीवीर दिमुथ करुणारत्ने याने आपल्या ३५६ धावांचा जोरावर तीन क्रमांकांनी वर सरकताना कारकिर्दीतील सर्वोत्तम सातवे स्थान मिळविले आहे. दीर्घ कालापासून कसोटी क्रिकेटपासून दूर राहूनही स्टीव स्मिथने आपले पहिले स्थान राखले आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली द्वितीय स्थानावर आहे. निलंबनामुळे द. अफ्फ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका मुकलेला दिनेश चंदीमल याने दोन क्रमांकांनी वाटचाल करत आठवा क्रमांक मिळविला आहे. भारताचा चेतेश्‍वर पुजारा दहाव्या स्थानी आहे. अन्य भारतीयांमध्ये अजिंक्य रहाणे १८व्या व लोकेश राहुल १९व्या स्थानी आहे.