पणजी दूरदर्शनवर मराठी कार्यक्रमांचे प्रसारण करणार

0
122

>> संचालकांचे साहित्यिक संस्थांच्या शिष्टमंडळाला आश्‍वासन

सोमवारी गोव्यातील प्रमुख साहित्यिक सांस्कृतिक संस्थांच्या शिष्टमंडळाने पणजी दूरदर्शनचे संचालक बी. आर. बी. हुसेन यांची भेट घेऊन त्यांना मराठी कार्यक्रम प्रसारित करण्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी संचालकांनी या शिष्टमंडळाला मराठी कार्यक्रम सादर केले जातील, असे आश्‍वासन दिले.

संचालकांनी सांगितले की, मराठी कार्यक्रम बंद केलेले नाहीत. मराठी कार्यक्रम सादर करण्यासाठी कलाकारांनी यावे, त्यांचे स्वागतच असेल. शिष्टमंडळात गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत, प्रागतिक विचार मंच, बोरीचे अध्यक्ष दशरथ परब, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर यांचा समावेश होता.

आजच्या घडीला गोव्यात मराठी प्राथमिक विद्यालयात बत्तीस हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गोव्यातील बहुसंख्य वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके मराठीतून प्रकाशित होतात. ग्रामपंचायती, सहकारी संस्था, सांस्कृतिक संस्था ग्रंथालये, देवालये इत्यादी ठिकाणी मराठी भाषेचाच उपयोग केला जातो. तसेच गोव्यात सांस्कृतिक, साहित्यिक संस्थांच्या माध्यमातून भजन, कीर्तन, नाटक, संगीताचे हजारोंच्या संख्येने मराठी कार्यक्रम होत असतात, अशी माहिती संचालकांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे, की गोवा दूरदर्शनवर मराठी कार्यक्रम बंद झाल्यास सामाजिक, सांस्कृतिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे व विनाकारण भाषिकवादाला खतपाणी घातल्यासारखे होईल. दरम्यान, मराठी बातम्या प्रसारित करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली असता हुसेनी यांनी सांगितले की, बातम्यांचे वेळापत्रक केंद्रीय स्तरावर ठरलेले असल्याने आपण त्यात हस्तक्षेप करू शकत नाही.