मृदुनी कुसुमादपि

0
257

गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या निधनाची आकस्मिक येऊन आदळलेली वार्ता सुन्न करणारी आहे. बिहारची – मिथिलेची ही बेटी आता कायमची निजधामाला गेली आहे. गोव्यामध्ये राज्यपाल अनेक आले नि गेलेे, परंतु आपल्या येथील जेमतेम पाच वर्षांच्या काळामध्ये त्यांनी गोव्याशी जे नाते जोडले, ते त्या येथून गेल्यानंतरही कायम राहिले होते. सध्या त्या त्यांच्या आठवणी लिहिण्यात व्यग्र होत्या, ज्यामध्ये गोव्याच्या सुंदर वास्तव्याच्या आठवणीही प्रामुख्याने त्यांना लिहायच्या होत्या. तीन बाजूंनी समुद्राने वेढलेल्या गोव्याच्या सुंदर राजभवनावरील आपल्या वास्तव्याच्या आठवणी त्यांच्या मनात सदैव ताज्यातवान्या होत्या. आजच्या अंकात पान २ वरील त्यांचा त्यासंदर्भातील ललितरम्य लेख जरूर वाचावा.

मुळात मृदुलाजींचा पिंड साहित्यिकाचा. त्यातही स्त्री, तिच्या मनोव्यथा, वेदना हा आत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय. त्यांच्या विपुल लेखनामधूनही स्त्रीविषयक व्यथावेदना प्रामुख्याने प्रकटताना दिसतात. जी ४६ पुस्तके त्यांच्या नावावर आज आहेत. त्यामध्ये कथा, कादंबर्‍यांचा प्रामुख्याने समावेश आहे आणि त्या बहुतेकांचा स्त्री हाच केंद्रबिंदू राहिला आहे. ‘मात्र देह नही है औरत’ हे त्या ठणकावून सांगताना दिसतात!

त्यांच्या जिव्हाळ्याचा दुसरा विषय म्हणजे आपल्या सणा – उत्सवांमधून प्रकटणारी सांस्कृतिक मूल्ये. गोव्यामध्ये त्या आल्या तेव्हा त्याच्या देशपातळीवरील प्रतिमेच्या पलीकडील खर्‍या गोव्याचे अंतरंग पाहण्याची उदंड उत्सुकता त्यांना होती व त्यांनी त्यासाठी येथील जनतेशी स्नेहसंबंध जोडले. पुस्तक प्रकाशनेच नव्हे, तर लग्न, मुंजीसारख्या समारंभांनाही बोलावणे आले की त्या आवर्जून जात, त्यामागे गोव्याचे अंतरंग अनुभवणे हेच मुख्य कारण असल्याचे त्यांनीच नवप्रभेत लिहिले होते. बिहारमधील प्रसिद्ध छठपूजेवर त्यांनी एकदा आमच्याकडे लिहिले होते. हे व्रत करणार्‍या महिला मावळत्या सूर्यदेवाला अर्घ्य देताना त्याच्याकडे मुलीची कामना करतात हा भावार्थ त्यांना मनोरम वाटे. स्त्रियांना अधिकार मिळाले पाहिजेत, परंतु ते अधिकारांची भीक मागून नव्हे, तर त्यांच्या कर्तृत्वाने मिळाले पाहिजेत अशी त्यांची ठाम भूमिका होती.

राजकारणात येण्यापूर्वी मूळच्या प्राध्यापिका असल्याने उत्तम, व्यासंगपूर्ण वक्तृत्वाची देणगी त्यांना लाभली होती. त्यामुळे कोणत्याही समारंभातील त्यांचे भाषण हा नुसता सोपस्कार नसायचा. त्यामधून त्या कळकळीने आपले म्हणणे मांडायच्या. त्यांच्यापाशी सांगण्यासारखे स्वतःचे असे काही निश्‍चित असे. साहित्यिक असल्याने ती भाषणे शैलीदार होत असत. खरे तर पतीराजांचे बोट धरून त्या राजकारणात आल्या. त्यांचे पती डॉ. रामकृपाल सिन्हा हे राजकारणात सक्रिय होते. बिहारमध्ये एकेकाळी कॅबिनेट मंत्री होते. केंद्रात राज्यमंत्रिपदही त्यांना लाभले होते. त्या सहजीवनातून मृदुलाजीही समाजकारणात सक्रिय झाल्या. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात त्यांची केंद्रीय समाजकल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. त्या निमित्ताने त्यांना देश पाहायला मिळाला. देशाच्या सामाजिक समस्या जाणून घेता आल्या, ज्या त्यांनी आपल्या लेखनातून मांडल्या. राज्यपालपदावर असतानाही त्यांनी आवर्जून आपले लेखन सुरूच ठेवले होते. राज्यपालपदावरील व्यक्ती म्हणजे जगाशी संबंध तोडून एकांतवासामध्ये राहायला आलेला पाहुणा नव्हे अशी त्यांची धारणा होती. हे उपभोगाचे नामधारी पद नव्हे, तर जनसामान्यांच्या भल्यासाठी वावरण्याचे ते एक साधन आहे या भावनेने त्या पदावरील ज्या काही व्यक्ती वावरल्या, त्यामध्ये मृदुलाजींचे नाव घ्यावे लागेल. पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत’ च्या हाकेला पहिला प्रतिसाद देणार्‍यांमध्ये त्यांचा समावेश होता. राजभवनवर स्वतः पुढाकार घेऊन त्यासाठी त्यांनी विविध समाजघटकांच्या बैठकाही घेतल्या होत्या, परंतु त्यांचे ते स्वप्न गोव्यात प्रत्यक्षात अवतरू शकले नाही.

खरे तर राजकारण त्यांना कितपत कळले शंकाच आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जेव्हा कॉंग्रेसला भाजपहून अधिक जागा मिळूनही नितीन गडकरींनी रातोरात सर्जिकल स्ट्राईक करून भाजपच्या सरकारस्थापनेचा घाट घातला तेव्हा या घटनाक्रमाने अचंबित झालेल्या मृदुलाजींनी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटलींचा सल्ला घेतला होता आणि सर्वांत कमाल म्हणजे स्वतःच हे प्रसारमाध्यमांना सांगून टाकले होते! राज्यसभेत विरोधकांनी यावरून कामकाजही बंद पाडले. राजकारण हा मृदुलाजींचा घास नव्हताच. त्या एक संवेदनशील साहित्यिक होत्या आणि आता मरणोपरान्त त्यांची तीच खरी ओळख राहील! ‘वज्रादपि कठोरानि, मृदुनी कुसुमादपी’ असे म्हणतात. त्या कधी कठोरपणे वागल्याचे गोमंतकीयांच्या तरी अनुभवास आले नाही. गोमंतकीयांच्या स्मरणात त्या नेहमी ‘मृदुनी कुसुमादपी’च होत्या आणि कायम राहतील!