माजी राज्यपाल मृदुला सिन्हा निवर्तल्या

0
251

>> ऑगस्ट २०१४ ते ऑक्टोबर २०१९पर्यंत गोव्याच्या राज्यपाल

>> साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातही भरीव कार्य

गोव्याच्या माजी राज्यपाल, साहित्यिक श्रीमती मृदुला सिन्हा (७८) यांचे बिहार राज्यातील मुजफ्फरपूर येथे काल निधन झाले. त्यांनी ऑगस्ट २०१४ ते ऑक्टोबर २०१९ या काळात गोव्याच्या राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मृदुला सिन्हा यांनी साहित्यिक, सामाजिक क्षेत्रात कार्य करताना भाजपच्या संघटनात्मक कार्यात मोठे योगदान दिले होते. त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष म्हणून काम केले होते. त्यांना साहित्याची आवड असल्याने गोव्यातील आपल्या राज्यपालपदाच्या कारकिर्दीत सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देऊन आपल्या साहित्यिक प्रतिभेचे दर्शन घडविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालपदी असताना सिन्हा यांची ‘स्वच्छता दूत’ म्हणून नियुक्ती केली होती.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सिन्हा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.’

साहित्यक्षेत्रात मुशाफिरी करणार्‍या राज्यपाल
मृदुला सिन्हा यांना राज्यपाल म्हणून काम करण्याची संधी जरी मिळाली, तरी मूलतः त्यांचा पिंड हा साहित्यिकाचा होता. साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी विपुल लेखन केले आहे. आपल्या गोव्यातील वास्तव्यातही त्या राजकारण्यांपेक्षा साहित्यिकांमध्ये व विशेषतः लेखिकांच्या सहवासात रमायच्या.
मृदुला यांचा जन्म १९४२ साली बिहारमधील मुजफ्फरनगरमधील छपरा या गावी झाला. त्यांनी केंद्रीय समाजकल्याण मंडळाच्या अध्यक्षा म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मानसशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी पदवी संपादन केली.

मुजफ्फरनगर येथील महाविद्यालयात व्याख्याता म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. पुढे त्या साहित्यसेवेकडे वळल्या.

मृदुला सिन्हा यांनी राजमाता विजयाराजे शिंदे यांचे चरित्र ‘एक थी रानी ऐसी भी’ या नावाने लिहिले आहे. त्यांची ‘नयी देवयानी’, ‘घरवास’, ‘ज्यो मेहंदीको रंग’, ‘सीता पुनी बोली’ या कादंबर्‍या, तर ‘बिहारकी लोककथाएँ’, ‘देखा मै छोटे लगे’, ‘ढाई बिघा जमीन’ हे कथासंग्रह, तसेच ‘मात्र देह नही है औरत’ हे स्त्री मुक्तीविषयक लेखन, ‘प्लेझर ऑफ डिझायर’ या पुस्तकाचे संपादन अशी पुस्तके प्रकाशीत झाली आहेत.

त्यांचे पती डॉ. रामकृपाल यांच्यासमवेत त्यांनीही राजकारणाच्या क्षेत्रात पदार्पण केले. त्यांचे पती बिहारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीही होते.