उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांची प्रकृती आणखी खालावली असून त्यांना आता क्रिटिकल केअर यूनिटमध्ये (सीसीयू) हलवण्यात आले आहे. मुलायमसिंह यांची प्रकृती रविवारी बिघडल्यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांची तब्येत आणखी खालावल्याने त्यांना आयसीयूमधून सीसीयूमध्ये दाखल केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत अखिलेश यादव यांच्याकडे विचारपूस केली आहे. याशिवाय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मुलायम यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.