मुलांच्या आजाराची चर्चा नको

0
117
  • नीना नाईक

शक्यतो या आजाराबाबतची चर्चा टाळा. प्रत्येक कॅन्सर वेगळा असतो. अर्धवट ज्ञानाने आपण पेशंटचा ‘आत्मविश्‍वास’ कमी करतो. ती वयाने लहान आहे. कदाचित समूळही तो जाऊ शकतो’’. यावर तिची आई पटकन् म्हणाली, ‘‘तुमच्या तोंडात साखर पडो.’’

ऍडमिशनची लाईन मोठी होती. शाळा सुरू केली तेव्हा केवळ चार विद्यार्थी होते. आता हाच आकडा शंभरावर पोहोचला आहे. यावेळी तर ३०० विद्यार्थी होते. प्रवेश ऑनलाईन असल्याने सर्वच सुरळीत चालू होते. विद्यार्थ्यांची प्राथमिक चाचणी घेऊन फॉर्म भरण्याची प्रक्रिया स्टाफ करत होता. एकापाठोपाठ एक अशी विद्यार्थ्यांशी बोलणी चालू होती. पालकांकडून हवी ती माहिती खरी- खोटी मिळत होती. अशातच तिचा नंबर आला. प्रसन्न, हसरी. गोल वाटोळा चेहरा. उत्साहाची तरारी तिच्यात झळकत होती. दोन वेण्या सुंदर. तिने मला ‘विश’ केलं आणि आई आणि लेक माझ्या समोरच्या खुर्चीत स्थानापन्न झाल्या.

माहिती पुरवणे तेही मुद्देसूद. वाक्यांची मांडणी. हवे तिथे पॉझ घेणं.. व्यवस्थितपणे ती सांगत होती. चुणचुणीत मुलगी मला फार आवडली. तिच्या बोलण्या- वागण्यावरून ती अत्यंत हुशार असावी असं जाणवत होतं. मी तिला शेवटचा प्रश्‍न विचारला, ‘‘अगं, इतकी सर्वगुण असताना तू ओपन स्कूल का करतेस?’’ त्यावेळी तिचा चेहरा खिन्न झाला. आईने सावरून घेतले. मॅडम तिची तब्येत बरी नसते. माझी उत्सुकता ताणली गेली. इतक्या गोड मुलीला देवाने काय वाढून ठेवलंय? मी तिच्या आईला धीर देत म्हणाले, ‘‘आजपासून ती आमच्या शाळेची मुलगी आहे. तिला शाळेत काही झालं तर आमची जबाबदारी असणार. यासाठी तुमचे फोन नंबर देऊन ठेवा तीन-चार. एरवी फॉर्मवर एक नंबर असतो पण जर तो लागला नाही तर धांदल नको.’’ आईने भराभर नंबर दिले. मुलीच्या भावना, तिचा व्याकूळ चेहरा पाहून मी विषय थांबवला. फक्त मी जिथे बसते तिथे तिचे नंबर उतरवून घेतले आणि ‘इमर्जन्सी’ नंबर आणि तिचे नाव लिहून ठेवले.

ती शाळेत रमून गेली. आमच्या शाळेत पहिल्यांदा तिने ‘टिचर्स डे’ साजरा करायचा ठरवला. तिने पुढाकार घेऊन सर्वांकडून पाच- पाच रुपये जमा केले. टिचर्स-डेला मोठ्ठा केक घेऊन आली. त्यावर्षी फुलांचा वर्षावच शिक्षकांवर झाला. मी गुरगुरते म्हणून मला वाघाचे चित्र भेट दिले. टिचर्स-डेला आम्हीही मुलांसाठी खाऊ आणला. मुलांनी वेगवेगळे कार्यक्रम केले. ती सुंदर गायली. तो त्यांचाच दिवस होता. शाळेत डेकोरेशन केले. त्यातही तिने हिरीरीने भाग घेतला. दिवस भराभर निघून गेले. आता शाळेतील अभ्यासक्रमही संपत आला होता. परिक्षेची तयारी करून घेणे चालू झाले होते. ‘असाइनमेंट्‌स’चा ढीग पडला होता. मी ते तपासत होते. तेवढ्यात ती समोर येऊन बसली. चेहरा खूप उतरलेला वाटला. मला कल्पना होती की तिची तब्येत मध्येच बिघडते. त्यामुळे लगेच तिला मी खायला दिले. चहा करायला सांगितला. माझ्याच खोलीत सतरंजी, चादर टाकून तिला झोपायला सांगितले. तिला विचारले, ‘काय होतंय’. ती फक्त म्हणाली, ‘अस्वस्थ वाटतंय.’ अस्वस्थ वाटणे याचा अर्थ मी समजू शकले नाही. तात्काळ तिच्या घरी फोन केला आणि तिच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. ‘सकाळी काही खाल्लं नव्हतं का?’ हा खुळ्यागत प्रश्‍नही विचारला. ती थंडगार लागली. आता मात्र मी हादरले. इतर शिक्षकांनाही वर्गातून बाहेर बोलावले. तिचे हातपाय चोळायला आम्ही सुरवात केली. तेवढ्यात तिची आई धावतपळत आली. येताना कसलसं औषधही तिने आणले होते. तिने तिला ते दिले. आम्ही तिला खुर्चीत बसवले आणि त्यांच्या गाडीपर्यंत सोडले.
कित्येक दिवस ती आली नाही. रोज तिची आठवण येत होती. या ना त्या कारणाने तिला फोन करणे राहून जात होते. आज एक आठवडा झाला तरी ती दिसली नाही. मी लगेच फोन लावला. दोन नंबर लागले नाहीत. तिसरा लागला. तिची आई फोनवर बोलत होती. तिच्या तब्येतीची चौकशी केली आणि ‘तिला केव्हा शाळेत पाठवणार?’ हे तिला विचारले. तिनेही सहजपणे सांगितले, ‘एका आठवड्यानंतर पाठवीन’. ती तब्बल पंधरा दिवसांनी आली. अभ्यासक्रम संपल्याने मुलांना सुट्टी दिली होती. परिक्षा तोंडावर आल्या होत्या. शाळेत विद्यार्थी नव्हते. मी माझी कामं आटपत होते.

आमची शाळा तिसर्‍या मजल्यावर आहे. लिफ्ट नाही. त्यामुळे ती वर चढून आल्याने धापा टाकत होती. बरीच थकल्यासारखी वाटली. ती आली. स्वतःला सावरून श्‍वासोच्छ्वासाची गती स्थिर झाल्यावर मी तिच्याकडे पाहिले. तिला पाणी दिले. ती स्थिरस्थावर झाली. मी तिला विचारलं, ‘‘कसं वाटतंय?’’ ती म्हणाली, ‘मस्त’. ती उत्साहाने इथे-तिथे पाहात होती. नवीन काही दिसलं तर ‘हे मी मिस केलं’ अशा आशयाने बोलूनही दाखवले. माझी प्रतिक्रिया इतकीच होती, ‘‘तुला मॅडम शिकवतील. करून घेतील. घाबरु नकोस.’’ ती खुदकन् हसली. चित्रकलेच्या शिक्षिका तिथे होत्या. त्यांच्याबरोबर मी तिला बाहेर जायची विनंती केली आणि आता मी आणि तिची आईच खोलीत होतो.

आईला विषय काढायचा होता. ती म्हणाली, ‘‘मॅडम, माझ्या लेकीची खूप दिवस शाळा चुकली. तिचे मेडिकल सर्टिफिकेट मी आणले आहे. देऊ का?’’ मी गप्प राहिले. ‘‘मॅडम, तुम्ही विचारले नाहीत की तिला काय झालंय ते?’’ मी मंदपणे तिच्याकडे पाहून हसले. तिला सांगितले, ‘‘अहो, आजारपण हे आजारपण. आधीच तुम्ही त्यात गुंतलेल्या असाल. त्यात तुमच्या गडबडीत तुम्हाला काय विचारायचं? मीही पाहिली होती तिची अवस्था. तिचे स्वास्थ्य जास्त महत्त्वाचे आहे. आईच्या चेहर्‍यावरची चिंता आता कमी वाटली.

तिनेच आपले वाक्य पूर्ण केले. ‘‘मॅडम, तिला कॅन्सर आहे.’’ मला थोडीफार कल्पना होती. मी तिच्या आईला सांगितले, ‘‘पहा, ती फार गोड आहे. माझ्याकडे अशाप्रकारची मूल आधीही होती. ती फार नाजूक व आजारी दिसत. ही तशी दिसत नाही. ही फार खंबीर दिसते. हसरी आहे. तिला काहीही होणार नाही. हल्ली सायन्स फार पुढे गेलेले आहे. डायबेटीस असतो तसाच हा ‘कंट्रोल’ करणे हे महत्त्वाचे असते. डॉक्टर पूर्णपणे आपले काम करत आहेत. वेळेवर औषधं, चेकअप करा. तिला ‘नॉर्मल’ मुलांसारखे तुम्ही वाढवले आहे तसेच यापुढेही वाढवा. तिचे आजारपण दुसर्‍याला सांगून तिला खचून जायला देऊ नका. शक्यतो या आजाराबद्दलची चर्चा करून तिला वेगळे विचार करायला लावू नका. शक्यतो या आजाराबाबतची चर्चा टाळा. प्रत्येक कॅन्सर वेगळा असतो. अर्धवट ज्ञानाने आपण पेशंटचा ‘आत्मविश्‍वास’ कमी करतो. ती वयाने लहान आहे. कदाचित समूळही तो जाऊ शकतो’’. यावर तिची आई पटकन् म्हणाली, ‘‘तुमच्या तोंडात साखर पडो.’’