राजकीय सूडाचा वास

0
135

भारतीय जनता पक्षाचे नेते प्रेमानंद म्हांबरे यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी काल पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना भल्या पहाटे अटक केली. नंतर ते जामिनावर मुक्त झाले, परंतु ज्या प्रकारे रातोरात ही कारवाई झाली ती भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान सरकारच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. जरी या अटकेला म्हांबरे यांनी केलेल्या फौजदारी तक्रारीचा आधार असला तरी या कारवाईला राजकीय सूडाचा वास येतो आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना एखाद्या विरोधी आमदाराला अशा प्रकारे अट्टल गुन्हेगाराप्रमाणे रात्रीबेरात्री अटक होणे हे हेतूंबाबत शंका उत्पन्न करणारे आहे. या कथित धमकी प्रकरणाच्या आधी म्हांबरे यांनी खंवटे यांच्या विरोधात एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले. रोहन खंवटे हे अठरा कंपन्यांचे मालक आहेत, त्यांनी अमूक कर भरलेला नाही, तमूक केलेले नाही अशी आरोपांची फैर म्हांबरे यांनी त्या पत्रकार परिषदेत झाडली. परंतु त्यातील बहुतेक आरोप हे फुटकळ स्वरूपाचे आहेत. खंवटे पणजी महापालिकेला व्यावसायिक कर भरत नाहीत, त्यांची करंजाळेतील सदनिका महापालिकेत नोंदणीकृत नाही, हॉटेल आहे ते कर भरत नाही वगैरे वगैरे जे काही आरोप म्हांबरे यांनी केले ते दिवाणी स्वरूपाचे आहेत आणि पणजी महापालिका त्यांचे काय करायचे हे पाहून घेईल. १८ कंपन्यांच्या मालकीबाबत जो आरोप म्हांबरे यांनी केला, त्यापैकी १४ कंपन्या २०१२ साली स्थापन केल्याचे ते स्वतःच सांगतात. मग अशा माणसाला सोबत घेऊन आपल्या पक्षाने यापूर्वी सरकार कसे काय बनवले, एवढी वर्षे खंवटे यांची साथसोबत कशी काय घेतली ते म्हांबरे यांनी आधी सांगावे. खरे तर म्हांबरे हे निव्वळ प्यादे आहेत. त्यांच्या नथीतून तीर मारला गेला आहे. एखादी व्यक्ती जोवर आपल्या सोबत आहे तोवर पुण्यवान आणि साथ सोडली की पापी किंवा जोवर विरोधी पक्षात आहे तोवर पापी आणि आपल्या सोबत आली की मात्र तिची सगळी पापे धुतली जातात हा जो काही प्रकार गोव्यात चालला आहे तो अतिशय लाजिरवाणा आहे. जनता मूर्ख आहे असा समस्त राजकारण्यांचा समज असतो काय? गुन्हेगारी प्रकरणांच्या फायली बनवून ठेवायच्या आणि सोईस्कररीत्या वापरायच्या ही नीती माजी मुख्यमंत्र्यांच्या काळात सतत वापरली गेली. आता विद्यमान मुख्यमंत्रीही त्याच वाटेने जाणार असतील, तर त्यातून त्यांची प्रतिमा कलंकित होईल याचे भान त्यांनी जरूर ठेवावे. आज सत्तेत असलेले बाबू कवळेकर हे विरोधी पक्षनेते असताना त्यांच्यावर गंभीर आरोप केले गेले होते. केरळमध्ये त्यांची बेहिशेबी संपत्ती आहे इथपासून त्यांच्या घरी मटका साहित्य सापडल्यापर्यंत नाना प्रकरणांचा प्रचंड गाजावाजा तेव्हा केला गेला. बाबूंची पंधरा वेळा चौकशी झाली, तीन वेळा घरावर छापा पडला. परंतु ते भाजपमध्ये डेरेदाखल होताच सारे चिडीचूप झाले! बाबुश मोन्सेर्रात यांच्या बाबतीतही तेच घडताना दिसत आहे. त्यांच्याविरुद्धची प्रकरणे तर अतिशय गंभीर आहेत, परंतु आता कोणी त्याबद्दल चकार शब्द काढताना दिसत नाही. विश्‍वजित राणे यांच्यावरही प्राप्तिकर विभागाचे छापे पडले होते. मावीन गुदिन्होंच्या कथित वीज घोटाळ्याचा तर केवढा गहजब झाला होता. सोमनाथ जुवारकर, दयानंद नार्वेकर, मावीन गुदिन्हो, बाबुश मोन्सेर्रात, चर्चिल आलेमाव, दिगंबर कामत, रवी नाईक, बाबू कवळेकर, विश्‍वजित राणे या सर्वांनी सत्ताधार्‍यांच्या या कार्यपद्धतीचे चटके त्या त्या वेळी सोसले आहेत. ही सगळी मंडळी धुतल्या तांदळासारखी आहेत असे आम्हाला मुळीच म्हणायचे नाही, परंतु जी काही त्यांच्याविरुद्धची प्रकरणे असतील त्यांची शहानिशा करून तडीस का नेली जात नाहीत? सत्तेसाठी, सोईसाठी त्या प्रकरणांच्या फायलींचा वापर का होतो हा आमचा सवाल आहे. अशाने सत्तेला दडपशाहीची दुर्गंध येऊ लागतो हे विसरले जाऊ नये. खंवटे यांच्यावर झालेल्या आरोपांचे स्वरूप पाहता त्यांचे ‘गुन्हे’ शोधण्यासाठी जंग जंग पछाडले गेल्याचे स्पष्ट दिसते. ‘‘विरोधकांचे घोटाळे बाहेर काढू’’ अशी गर्जना करणार्‍या म्हांबरे यांनी भाजपच्या सत्तेच्या कनवटीला येऊन बसलेल्यांच्या आधीच्या कथित घोटाळ्यांचे काय झाले हे अगोदर सांगावे. विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी फायली बनवायचे तंत्र आता जुने आणि कालबाह्य झाले आहे. सोशल मीडियाच्या आजच्या युगामध्ये विरोधी स्वर असा दडपता येत नसतो हे आता सत्ताधार्‍यांनाही कळायला हवे. जे असा प्रयत्न करतात ते शेवटी जनतेच्या समोर तोंडघशी पडतात. खंवटे यांच्याविरुद्ध काही पुरावे असतील तर त्यांची शहानिशा जरूर व्हावी, परंतु अशा ‘कलंकित’ व्यक्तीला सोबत घेऊन सरकार का बनवले, मंत्रिपद का बहाल केले गेले आणि तेव्हा का मूग गिळून गप्प होता हे आधी सांगावे लागेल. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असे म्हणतात, परंतु सोबत असला की मित्र आणि विरोधात असला की शत्रू असा जो काही खेळ गोव्यात चाललेला आहे, तो लांच्छनास्पद आहे एवढे निश्‍चित!