शिवोलीचे आमदार तथा माजी मंत्री विनोद पालयेकर यांचे अमलीपदार्थ प्रकरणावरून आरोप करण्यामागे वेगळे नाटक असू शकते, अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्यावरील निष्क्रियतेच्या आरोपाचे खंडन केले आहे. शिवोलीचे आमदार पालयेकर यांनी राज्यातील अमलीपदार्थ व्यवहाराबाबत केलेला आरोप निराधार आहे.
गेल्या आठ महिन्यांत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ विक्रीच्या अनेक प्रकरणाची नोंद केली आहे. एका व्यक्तीकडून तीन कोटी रुपयांचे अमलीपदार्थ हस्तगत केले आहेत. आमदार पालयेकर यांनी अमलीपदार्थ व रेव्ह पार्टीबाबत दिलेले पत्र पोलीस यंत्रणेकडे पाठविण्यात आले असून पोलिसांकडून योग्य चौकशी करून संबंधिताच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
आमदार पालयेकर वैफल्यग्रस्त बनल्याने निराधार आरोप करीत आहे. आमदार पालयेकर यांनी पोलीस यंत्रणेने अमलीपदार्थाच्या विरोधात केलेल्या कारवाईचा आढावा घ्यावा, असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला.