समुद्र किनार्‍यावरील रेव्ह पार्ट्यांवर सरकारचे नियंत्रण नाही ः पालयेकर

0
140

राज्यातील समुद्रकिनारी भागात रेव्ह पार्टी आणि अमलीपदार्थ पार्टीचा सुळसुळाट झाला आहे. सरकारी यंत्रणेचे या पार्ट्यांवर कोणतेही नियंत्रण नाही. शिवोली मतदारसंघात पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक हे ड्रग्स माफियासोबत फिरताना दिसत आहेत, असा आरोप शिवोलीचे आमदार तथा माजी मंत्री विनोद पालयेकर यांनी गोवा फॉरवर्डच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केला.

राज्यातील किनारी भागातील रेव्ह पार्टी आणि अमलीपदार्थ पार्टीवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना गृहखात्याचा कारभार पेलत नसल्यास त्यांनी मंत्रिमंडळातील अन्य सक्षम मंत्र्याकडे गृह खात्याचा कारभार सुपूर्द करावा. मायकल लोबोसुध्दा गृह खात्याचा कारभार योग्य प्रकारे हाताळू शकतात, असा दावा आमदार पालयेकर यांनी केली.

शिवोली मतदारसंघासह राज्यातील किनारी भागात रेव्ह पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. किनारी भागाबरोबर राज्यातील इतर भागातही अमलीपदार्थ पोहोचला आहे. सरकारी यंत्रणा निष्क्रिय झाल्याने ड्रग्स पॅडलर यांचे फावते. काही सरकारी अधिकार्‍यांकडून अमलीपदार्थाच्या व्यवसायाला खतपाणी घातले जात आहे. भावी पिढी व्यसनाधीन बनू नये म्हणून वेळीच कारवाई करण्याची गरज आहे, असेही पालयेकर यांनी सांगितले.
अमलीपदार्थ आणि रेव्ह पार्टीबाबत पोलीस यंत्रणेला माहिती देण्यात आली आहे. रेव्ह पार्टीचे आयोजन करणार्‍यांकडून संबंधित उपजिल्हाधिकारी कार्यालयातून ध्वनिक्षेपक लावण्यासाठी परवानगी घेतली जात आहे. तथापि, रात्रभर ध्वनिक्षेपक लावला जातो, असा दावा पालयेकर यांनी केला.