‘मुके-बहिरे’ टोळीकडून साडेसात लाखांचे मोबाईल जप्त

0
9

>> चोरीवेळी बहिरे, मुके असल्याचा करायचे बहाणा; शिमोगा-कर्नाटकातील तीन जणांना अटक

बहिरे, मुके असल्याचा बहाणा करून पणजी शहर आणि इतर भागांत ‘रुम शेअरिंग’ पद्धतीने राहणाऱ्या नागरिकांच्या खोल्यांमध्ये घुसून महागड्या मोबाईल फोनची चोरी करणाऱ्या एका टोळीतील तीन जणांना पणजी पोलिसांनी काल अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 7 लाख 50 हजार रुपयांचे 23 मोबाईल फोन हस्तगत करण्यात पोलिसांनी यश मिळविले.

येथील सम्राट गेस्ट हाउसमध्ये रुम शेअरिंग पद्धतीने राहणाऱ्या सूरज सिंग याचा सुमारे 75 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरीस गेला होता. या चोरी प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांना मोबाईल चोरी करणाऱ्या एका टोळीला अटक केली. या टोळीतील संशयित आरोपी शिमोगा-कर्नाटक येथील रहिवासी असून, ते झुआरीनगर वेर्णा येथे राहत होते. डी. के. लक्ष्मणा (26), संदीप एन. (30) आणि संतोष भोवी (25) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.

या टोळीतील सदस्य मुके, बहिरे असल्याचा बहाणा करून रुम शेअरिंग करून राहणाऱ्या नागरिकांच्या खोलीत घुसून टेहळणी करायचे आणि नंतर चोरी करायचे. एखाद्या वेळी रुममध्ये घुसल्यानंतर कुणी पाहिले, तर आपण मुके, बहिरे असल्याचे सांगून प्रमाणपत्र सुध्दा दाखवत होते. पोलिसांनी त्या टोळीकडून मुके, बहिरे असल्याची प्रमाणपत्रे हस्तगत केली आहेत. संशयितांकडील सदर प्रमाणपत्रे बनावट असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रमाणपत्राबाबत चौकशी केली जाणार आहे, असेही निधीन वाल्सन यांनी सांगितले.

शिमोगा येथील टोळी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांत बॅग पळविणे, मोबाईल फोन चोरीच्या प्रमाणात गुंतलेली आढळून आली आहे. संशयित डी. के. लक्ष्मणा याला पणजी पोलिसांनी 2020 मध्ये चोरी प्रकरणामध्ये अटक करून नंतर त्याला शिक्षाही झाली होती, असेही वाल्सन यांनी सांगितले. या चोरी प्रकरणी पोलीस उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निखिल पालेकर तपास करीत आहेत.