कारकुनासह दोघे अबकारी निरीक्षक निलंबित

0
3

>> अबकारी आयुक्त नारायण गाड यांच्याकडून आदेश जारी; मार्च 2018 ते मार्च 2022 या काळात झाला होता घोटाळा

अबकारी खात्याच्या पेडणे येथील कार्यालयात परवाने नूतनीकरणाद्वारे लाखो रुपयांच्या घोटाळा केल्या प्रकरणी एका कारकुनासह दोन अबकारी निरीक्षकांना काल निलंबित करण्यात आले. अबकारी खात्याचे आयुक्त नारायण गाड यांनी काल दोन अबकारी निरीक्षक आणि मुख्य संशयित कारकुनाच्या निलंबनासंबंधी आदेश जारी केला. निलंबन झालेल्यांमध्ये कारकून हरिश नाईक आणि दुर्गेश नाईक व विभूती शेट्ये यांचा समावेश आहे.

पेडणे अबकारी कार्यालयात मद्य व्यावसायिकांच्या अबकारी परवाने नूतनीकरणामध्ये गैरव्यवहार करून सुमारे 76 जणांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सुरुवातीला कारकून हरिश नाईक याला निलंबित करण्यात आले. तसेच त्यानंतर डिसेंबर 2017 ते जानेवारी 2022 या काळात पेडणे अबकारी कार्यालयात निरीक्षकपदी असलेले दुर्गेश नाईक (सध्या तिसवाडी अबकारी निरीक्षक) यांना आणि सध्या पेडणे कार्यालयातच अबकारी निरीक्षक-2 पदावर कार्यरत असलेल्या विभूती शेट्ये यांना निलंबित करण्यात आले. या तिघांना निलंबनाच्या काळात अबकारी खात्याच्या मुख्यालयात हजेरी लावण्याची सूचना करण्यात आली आहे.

मार्च 2018 ते मार्च 2022 या काळात हा घोटाळा करण्यात आला होता. पेडणेतील मद्य व्यावसायिकांना अबकारी परवान्याची थकित रक्कम भरण्याची नोटीस पाठविल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. पेडणे कार्यालयातील कारकुनाने मद्य व्यावसायिकांच्या अबकारी परवान्यांच्या नूतनीकरणात त्यांच्याकडून रोख रक्कम स्वीकारली; मात्र ती रक्कम बँक खात्यात जमा केली नाही, असे तपासात उघड झाले आहे. मद्यविक्री परवान्याचे नूतनीकरणाची रक्कम भरण्याची नोटीस पाठविण्यात आलेल्या त्या मद्य व्यावसायिकांना निरीक्षकांच्या सहीचे चलन देण्यात आले होते.
पंधरा दिवसांपूर्वी सदर प्रकरण उघडकीस आल्यानंतर पेडणे कार्यालयातील कारकून हरिश नाईक याची सत्तरी अबकारी कार्यालयात बदली करण्यात आली होती. या प्रकरणी अबकारी खात्याच्या मुख्यालयातील अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी करण्यात आली. फसवणूक करण्यात आलेल्या मद्य व्यावसायिकांची पणजी येथील मुख्यालयात जबान्या नोंदवून घेण्यात आल्या. या घोटाळा प्रकरणी पेडणे कार्यालयातील तत्कालीन अबकारी निरीक्षकांची चौकशी करण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी या प्रकरणावर भाष्य करताना या घोटाळ्याची चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच सर्व रक्कम वसूल करण्यासह दोषींची गय करणार नसल्याचेही नमूद केले होते.

28 लाखांची रक्कम जमा
या प्रकरणातील मुख्य संशयित कारकून हरिश नाईक याने मद्य व्यावसायिकांची लाखो रुपयांची फसवणूक केली; मात्र हा घोटाळा उघड झाल्यानंतर हे प्रकरण शेकणार असल्याचे लक्षात येताच त्याने स्वत:ला वाचवण्यासाठी टप्प्याटप्प्यात लाखो रुपयांचा भरणा अबकारी खात्याकडे केली आहे. त्याने आतापर्यंत जवळपास 27 ते 28 लाख रुपयांचा भरणा केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.