मुंबई सिटीची चेन्नईनविरुद्ध पिछाडीवरून बाजी

0
257

हर्नान सँटाना आणि ऍडम ली फॉंड्रे यांनी नोंदविलेल्या गोलांच्या जोरावर मुंबई सिटी एफसीने चेन्नईन एफसीवर २-१ अशी मात करीत सातव्या हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत काल शानदार विजय नोंदविला. मुंबई सिटीने पहिल्या सत्रात पिछाडीवर पडल्यानंतरही मध्यंतरास बरोबरी साधत दुसर्‍या सत्रात प्रतिआक्रमण रचत बाजी मारली.

बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. स्लोव्हाकीयाचा ३१ वर्षीय स्ट्रायकर जेकब सिल्व्हेस्टर याने ४०व्या मिनिटास चेन्नईनचे खाते उघडले. पूर्वार्धाच्या भरपाई वेळेत मध्य फळीतील स्पेनचा ३० वर्षीय खेळाडू हर्नान सँटाना याने मुंबईला बरोबरी साधून दिली. मग आघाडी फळीतील ब्रिटनचा ३४ वर्षीय खेळाडू ऍडम ली फॉंड्रे याने दुसर्‍या सत्रात मुंबईला आघाडी मिळवून दिली.
स्पेनच्या सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्‍या मुंबई सिटीचा हा ५ सामन्यांतील चौथा विजय असून त्यांचा एक पराभव झाला आहे. सर्वाधिक १२ गुणांसह मुंबईने आघाडी वाढवली. नॉर्थईस्ट युनायटेड एफससी (५ सामन्यांतून ९) दुसर्‍या, एटीके मोहन बागान (४ सामन्यांतून ९) तिसर्‍या, तर बेंगळुरू एफसी (४ सामन्यांतून ६) चौथ्या क्रमांकावर आहे.
चेन्नईनला ४ सामन्यांत दुसरा पराभव पत्करावा लागला. एक विजय व एका बरोबरीसह त्यांचे ४ गुण व आठवे स्थान कायम राहिले.

खाते उघडण्याची शर्यत चेन्नईन एफसीने जिंकली. मध्य फळीतील युवा खेळाडू लालीयनझुला छांगटे याने उजवीकडून ही चाल रचली. त्याने मुसंडी मारत मुंबई सिटीच्या दोन खेळाडूंना चकवून गोल क्षेत्रात प्रवेश केला. त्यावेळी सिल्व्हेस्टर नेटसमोरच होता. उजवीकडून पास मिळवात त्याने मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याला चकवित गोल केला.

पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत मुंबई सिटीने बरोबरी साधली. सेट-पिसेसवरील कौशल्यामुळे त्यांना हा गोल करता आला. मध्य फळीतील मध्यरक्षक ह्युगो बौमासने अचूक टायमिंग साधत कॉर्नर घेतला. त्यामुळे मिळालेल्या चेंडूला मध्य फळीतील हर्नान सँटाना याने नेटची दिशा दिली. चेन्नईनचा गोलरक्षक विशाल कैथ हा चेंडू चपळाईअभावी अडवू शकला नाही.

मध्यंतराच्या १-१ अशा बरोबरीनंतर मुंबई सिटीने ७५व्या मिनिटाला आघाडी घेतली. फ्री किकवर अहमद जाहू याने मारलेला चेंडू रॉलीन बोर्जेस याच्या दिशेने गेला. बोर्जेसने ऍडमच्या स्थितीचा आधीच अंदाज घेतला होता. त्याच्या पासवर ऍडमने फिनिशींग करताना प्रतिस्पर्धी गोलरक्षक कैथला यशस्वीरित्या हुलकावणी दिली.

सामन्यातील पहिला कॉर्नर दुसर्‍याच मिनिटाला चेन्नईनला मिळाला. फातखुलो फातखुल्लोएव याने क्रॉस शॉट मारत चेंडू गोलक्षेत्रात घालवला, पण मुंबईचा बचावपटू मुर्तडा फॉल याने हेडिंगद्वारे चेंडू बाहेर घालवला. त्यामुळे पुन्हा कॉर्नरचा इशारा झाला. यावेळी रॅफेल क्रिव्हेलारोने कॉर्नर घेतल्यानंतर बचावपटू इनेस सिपोविचने पलीकडील बाजूला हेडिंग केले. त्यावेळी सिल्व्हेस्टरला संधी होती, पण त्याने मारलेला चेंडू बारवरून गेला.

आठव्या मिनिटाला बुमूसने मुसंडी मारत उजवीकडे रेनीयर फर्नांडिस याच्यासाठी संधी निर्माण केली. रेनीयर चेंडूवर ताबा मिळवत असतानाच सिपोविचने मैदानावर घसरत संतुलन साधत त्याला रोखून चेंडूवर ताबा मिळवला.