मुंबईचा ८७ धावांत खुर्दा

0
85

सनरायझर्स हैदराबादने काल मंगळवारी मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना १८.४ षटकांत केवळ ११८ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर सनरायझर्सने मुंबईचा डाव १८.५ षटकांत ८७ धावांत संपवून सनसनाटी निकालाची नोंद केली.

प्रमुख गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार व उंचपुरा वेगवान गोलंदाज बिली स्टेनलेक यांच्या अनुपस्थितीतही हैदराबादने मुंबईला लोळविण्याची कामगिरी केली. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारल्यानंतर हैदराबादची २ बाद २० अशी स्थिती केली. धवन (५) व साहा (०) यांनी निराशा केल्यानंतर केन विल्यमसन (२९) व मनीष पांडे (१६) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. युसूफ पठाण (२९) व मोहम्मद नबी (१४) यांच्या फलंदाजीनंतरही हैदराबादचा संघ पूर्ण २० षटके खेळू शकला नाही. आपल्या आयपीएल इतिहासातील दुसर्‍या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या त्यांनी नोंदविली. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी खेळपट्टीवर टिकून राहण्याचे धारिष्ट्य दाखवले नाही.

सूर्यकुमार यादव (३४) व कृणाल पंड्या (२४) यांचा अपवाद वगळता एकालाही दुहेरी धावसंख्या करता आली नाही. हैदराबादकडून सिद्धार्थ कौलने ३, राशिद खान व बेसिल थम्पी यांनी प्रत्येकी २ तर संदीप शर्मा, नबी व शाकिब यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. कालच्या विजयासह सनरायझर्सने ६ सामन्यांतून ८ गुणांसह तिसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. आज बुधवारी चेन्नई सुपर किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना होणार आहे.