नेमबाजी ः रिझवीला रौप्यपदक

0
100

भारतीय नेमबाज शहाझार रिझवी याने कोरियातील चांगवोन येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्‍वचषक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. या पदकासह रिझवीने मेक्सिकोतील गुआदलारा येथे मागील महिन्यात झालेल्या विश्‍वचषक स्पर्धेत मिळविलेले विक्रमी सुवर्णपदक केवळ नशिबाच्या जोरावर नव्हते हे सिद्ध करून दाखवले.

काल मंगळवारी रिझवीने ५८२ गुणांसह सहावे स्थान मिळवून आठ खेळाडूंच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. रिझवीने अंतिम फेरीत २३९.८ गुण घेतले. त्याचे सुवर्णपदक केवळ ०.२ गुणांनी हुकले. २४ वर्षीय रिझवीने पाच नेमांच्या पहिल्या फेरीत १० गुणांसह सुरुवात केली होती. परंतु, दुसर्‍या फेरीत तीन वेळा ९ गुण घेतल्याचा फटका त्याला बसला. यामुळे त्याचे एकूण गुण कमी झाले. रशियाच्या आर्टेम चेरनुसोव याचा अपवाद वगळता इतर नेमबाजांमध्ये सुद्धा सातत्याचे अभाव दिसून आला. २४ नेमांच्या अंतिम फेरीत १८व्या नेमानंतर रिझवी रशियन प्रतिस्पर्ध्यापेक्षा ४.३ गुणांनी मागे होता. यानंतर रिझवीने १०.६, १०.६, १०.९ व १०.२ गुण घेत शेवटच्या दोन नेमांवेळी अंतर ०.४ गुणांपर्यंत कमी केले. शेवटच्या दोन प्रयत्नात रिझवीने ९.९ व १० गुण घेतले तर रशियन खेळाडूने ९.७ व १० गुण मिळवत सुवर्णपदक आपल्या नावे केले. बल्गेरियाच्या सामुईल डोंकोव याने २१७.१ गुणांसह कांस्य पदक जिंकले.