‘मी टू’ ः चौकशी समिती स्थापन करणार ः मनेका

0
110

नवी दिल्ली
विविध क्षेत्रातील महिलांनी स्वतःवरील लैंगिक छळणुकीविषयी संबंधितांच्या नावांसह जाहीर वाच्यता करण्याचे सत्र सुरू झाल्यानंतर व या ‘मी टू’ प्रकरणांमध्ये केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांचाही समावेश झाल्याने केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री मनेका गांधी यांनी अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती स्थापनेच्या निर्णयाची घोषणा केली आहे.
‘मी टू’ मोहिमेसंदर्भातील प्रकरणांच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मनेका गांधी यांनी सांगितले.
लैंगिक छळणुकीच्या प्रत्येक तक्रारीमागे कोणत्या वेदना व यातना असू शकतात त्याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. लैंगिक छळणुकीच्या ज्या तक्रारी आहेत त्यासंदर्भात कठोरपणे चौकशी व कारवाई व्हायला हवी. तक्रारी करणार्‍या अशा सर्व महिलांवर आपला पूर्ण विश्‍वास असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. असे प्रकार रोखण्यासाठी काय करणे शक्य आहे त्यासंबंधी शिफारशीही वरील समिती आपल्या मंत्रालयाला करील असे त्यांनी स्पष्ट केले.