मी एक आत्मा; शरीर हे साधन!

0
21

योगसाधना- 621, अंतरंगयोग- 207

  • डॉ. सीताकांत घाणेकर

व्यक्तीला जाणीव होते की मी शेवटी एक आत्मा आहे. शरीर हे एक साधन आहे, जे जन्माच्या वेळी मिळाले व मृत्यूच्यावेळी सोडायचे आहे. प्रत्येक जीवनात ज्या काही घटना घडतात, कळत-नकळत, या सर्वांचा परिणाम शेवटी आत्म्यावर होतो.

आत्मा आईच्या गर्भात प्रवेश करतो व त्याचे या जन्मातील अस्तित्व सुरू होते. कुणाचे आयुष्य किती असेल याबद्दल कुणीही काही सांगू शकत नाही, त्याबद्दल भाकित करू शकत नाही. जन्म व मृत्यू दोन्ही गूढ आहेत. त्या निश्चित घटना आहेत.
गर्भात प्रवेश केल्यापासून आत्म्याची विविध नाती सुरू होतात. आधी कुटुंबात. माता-पिता, आजी-आजोबा, भाऊ-बहीण, काका-काकी, मामा-मामी, आत्या अशी कितीतरी… तद्नंतर जन्म होतो. मूल थोडे थोडे वयाने मोठे होते तसे त्याचे संबंध वाढत जातात. शेजारी प्रथम, मग शाळा, कॉलेज. येथे तर त्याचे आणखी व्यक्तींकडे संबंध येतात, नाती जुळतात. शिक्षणानंतर कामाची जागा ठरते. तिथेदेखील वेगवेगळ्या व्यक्ती भेटतात. आयुष्य पुढे जाते तशी या व्यक्तींची संख्या वाढतच जाते. त्याशिवाय सामाजिक संपर्कदेखील त्यात भर घालतो. येथे मुख्य मुद्दा म्हणजे, या संपर्कात येणाऱ्या सर्व व्यक्तींबरोबर आपले संबंध कसे असतात? एकसमान तर नक्कीच नाहीत!
बालपणात कुटुंबातील संबंध अत्यंत प्रेमाचे, सलोख्याचे असतात. जसजसे तरुणपणात पदार्पण होते तसतसे हे सर्व संबंध तसे असतीलच असे नाही. प्रौढपण आले की काहीवेळा बदल होऊ शकतो. अवश्य काहींचे संबंध तसेच राहतात. त्यामुळे सर्व व्यक्तींचे जीवन सुखी- आनंदी- समाधानी राहते. जीवनाची वाटचाल व्यवस्थित चालू राहते. पण याची खात्री नसते.

अनेक कारणांमुळे, छोट्या-मोठ्या मतभेदांमुळे हे परस्पर संबंध बिघडतात. किती बिघडतील याबाबत काही सांगता येत नाही. येथेसुद्धा विविध पैलू आहेत. त्यांत मुख्य असतो तो आर्थिक विषय- धंद्यासंबंधी, वडिलोपार्जित संपत्तीविषयी… त्याशिवाय मुले व पालक यांची मते- शिक्षणाचा विषय हा सुरुवातीचा असतो, तद्नंतर नोकरी अथवा स्वतःचा पेशा, धंदा, देशात स्थायिक व्हायचे की परदेशात वगैरे. या सर्व गोष्टी स्थिरस्थावर होत असतानाच मुलांच्या वैवाहिक जीवनाच्या चर्चा सुरू होतात. येथे तर विविध व्यक्तींची विविध मते- काहींची तर परस्परविरोधी. या अशा अनेक घटनांमुळे शांती बिघडते- वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक. शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाला स्वतंत्र विचार व त्याप्रमाणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात.

आजच्या या कलियुगात तर अशा घटनांचा उच्चांक दिसतो. त्यामुळे निराशा, तंटे, भांडणे, घटस्फोट वाढतच आहेत. दुर्भाग्याने तरुण पिढीदेखील अपवाद नाही. काहीजण यामुळे व्यसनाधीन होतात.
पूर्वीच्या काळी लहान मुलांवर घरी चांगले संस्कार व्हायचे. कुटुंबेदेखील एकत्रित होती. बालपणात घरी, शाळेत बोधपर कथा सांगितल्या जात असत. मातापित्यांचे प्रेम- श्रावणबाळ कथा; भगवद्‌‍ प्रेम व विश्वास- ध्रुवबाळ, भक्त प्रल्हाद; देश व संस्कृती प्रेम- अभिमन्यू, शिवाजी, संभाजी, झांशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, महाराणा प्रताप… भगतसिंग, सुभाषचंद्र बोस वगैरे; देशभक्त संत- मीराबाई, सखुबाई, गोरा कुंभार, तुकाराम, सावता माळी, नरहरी न्हावी, संत एकनाथ, संत कबीर… विविध वर्गांतील संत.
पंढरपुरात तर संतांचाच गरज- निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाय, एकनाथ, नामदेव, तुकाराम… त्याशिवाय घरात देवपूजा, संध्याकाळची पर्वचा, तसेच वर्षभर विविध उत्सव- प्रत्येक देवाच्या नावाने- गणेशचतुर्थी, नवरात्री, श्रीकृष्ण जन्माष्टमी, श्रीरामनवमी, दिवाळी; विविध भारतीय पद्धतीचे खेळ, रांगोळी प्रदर्शने; सांस्कृतिक कार्यक्रम- भजन, कीर्तन, नाटके, भाऊबीज वगैरे.
आजच्या तथाकथित आधुनिक विश्वात काही अंशी विविध गोष्टी चालू आहेत. नवीन गोष्टींचीदेखील भर पडत आहे- साखरपुडा, मेहंदी, विवाह सोहळा, रिसेप्शन… पण यांमध्ये पूर्वीचा गोडवा दिसत नाही. अनेकांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत.
आजच्या जगात अनेक गोष्टींचा जबरदस्त प्रभाव पडताना दिसतो. त्यांत मीडिया मुख्य भूमिका निभावते. प्रत्येकाला साधनेदेखील विविध- मोबाईल, लॅपटॉप, त्यांतील फेसबुक, ट्वीटर… त्याशिवाय रेडिओ, टीव्ही आहेतच!
सगळे नकारात्मकच आहे असे नाही. अनेक गोष्टी चांगल्यादेखील आहेत. त्यात मुलांचे, तरुणांचे छान कार्यक्रम आहेत- गाणी, नाटके, खेळ… त्याचबरोबर नवनवीन शोध- तरुण वयात.
अशा या परिस्थितीला कारणे अनेक आहेत. आपणातील प्रत्येकजण काही अंशी जबाबदारदेखील आहे. सूक्ष्म चिंतन केले तर हे लक्षात येईल. योग्य शिक्षणाचा अभाव असल्यामुळे अयोग्य शिक्षणाचा प्रभाव जास्त आहे. नकारात्मक कंपने जास्त आहेत.
प्रत्येक रोगाला शेवटी काहीतरी औषध आहेच- विविध वैद्यकीय क्षेत्रातील- ॲलोपथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्धा वगैरे… त्याशिवाय नैसर्गिक उपाय व योगशास्त्रदेखील आहे. पण हा उपाय शोधण्यासाठी थोडा अभ्यास व चिंतन आवश्यक आहे.

योगशास्त्रामध्ये व्यक्तीच्या विचारांना अत्यंत महत्त्व आहे. विचारांप्रमाणे माणसाच्या विविध पैलूना चालना मिळते- आहार, विहार, आचार. येथे आध्यात्मिक पैलूंवर जास्त भर दिला जातो. त्यामुळे व्यक्तीला जाणीव होते की मी शेवटी एक आत्मा आहे. शरीर हे एक साधन आहे, जे जन्माच्या वेळी मिळाले व मृत्यूच्यावेळी सोडायचे आहे. प्रत्येक जीवनात ज्या काही घटना घडतात, कळत-नकळत, या सर्वांचा परिणाम शेवटी आत्म्यावर होतो. यात परस्पर संबंध, नातीगोती येतातच.
शास्त्रकार म्हणूनच समजावतात- ‘कर्म तसे फळ’, ‘करावे तसे भरावे.’ शेवटी आत्मा आपले कर्म घेऊनच परमधामात जातो. त्याप्रमाणे ते संचितरूपात असते व पुढील जन्मात प्रारब्धरूपात प्रगट होते. म्हणून योगशास्त्रामध्ये आध्यात्मिक ज्ञानाला अत्यंत महत्त्व आहे.
स्वामी विवेकानंद म्हणूनच म्हणायचे- ‘विश्वाला गरज आहे ती पाश्चात्त्य तंत्रज्ञानाची व पौरात्त्य अध्यात्माची.’ प्रत्येक योगसाधकाने या विषयाचा थोडातरी अभ्यास करणे आवश्यक आहे.

  • राजयोगामध्ये सुरुवातीलाच आत्म्याचे ज्ञान मिळते. परमधामातून येणारा आत्मा मानवी शरीरातील ‘भ्रूमध्य’मध्ये (दोन भुवयांच्या मध्ये) स्थायिक होतो. गीतेतदेखील याबद्दल श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तुझे चित्त त्या स्थानावर एकाग्र कर.
  • सांख्ययोगमध्ये (अध्याय दुसरा) श्रीकृष्णाने आत्म्याचे विविध पैलू सांगितले आहेत- अमर, अजर, अविनाशी, निराकारी, निर्विकारी, निरहंकारी…
    राजयोगामध्ये आत्मा पवित्र आहे व परमात्म्याची संतान आहे हे ज्ञान मिळते. पुढे आत्म्याचे सप्तगुण कळतात- ज्ञानस्वरूप (आध्यात्मिक ज्ञान), सत्यस्वरूप, प्रेमस्वरूप, शांतीस्वरूप, सुखस्वरूप व आनंदस्वरूप.
    ब्रह्ममुहूर्तावर ध्यान करताना परमात्म्याकडून विविध शक्ती मिळवायच्या असतात व त्या सर्व शक्ती अनेक प्राण्यांना (मानवासहीत), निसर्गातील पंचमहाभूताना, वृक्ष-वनस्पतींना द्यायचे शिक्षण मिळते. त्याशिवाय मध्ये-मध्ये एकदोन मिनिटेदेखील ध्यान करायचे असते.

त्यामुळे सदैव शांतीचा अनुभव मिळतो. म्हणूनच व्यक्तीमध्ये गोडवा, मधुरता आपोआप येते. प्रसंग कितीही कटू असला, मतभेद असले तरी अशी व्यक्ती छान सकारात्मक कंपने सर्वत्र पसरवते. तसेच त्या व्यक्तीचे शब्द, कर्मदेखील मधुर असते. दुसरी व्यक्ती कशीही बोलली, वागली तरी ही व्यक्ती आध्यात्मिक असल्यामुळे शांत वागते. अशा व्यक्तीचे जीवन- जन्म ते मृत्यू आदर्श असते. समाजातील व्यक्तींचा, वातावरणाचा, घटनांचा परिणाम या व्यक्तीवर होत नाही. नाती सांभाळली जातात.
राम, कृष्ण, बुद्ध ही आपल्या भारतीय संस्कृतीमधील छान उदाहरणे आहेत. ते अवतार असले तरी मानवरूपातच त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतला. सामान्य व्यक्तींना असतात त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठ्या, वेगळ्या समस्या त्यांना आल्या. पण त्यांनी शक्यतो त्यांचे संबंध, नाती सांभाळली. त्याचप्रमाणे विविध संत-महात्मेदेखील आदर्श होऊ शकतात. त्यांचा अभ्यास व त्याप्रमाणे आचरण अपेक्षित आहे.