धोक्याची चाहुल

0
12

कोची येथील झामरा आंतरराष्ट्रीय परिषदगृहामध्ये झालेल्या स्फोटमालिकेमध्ये नुकताच तिघांचा बळी गेला, तर पन्नासहून अधिक लोक जखमी झाले. ख्रिस्ती समाजातील ‘येहोवाज्‌‍ विटनेसेस’ नामक एका छोट्या पंथाच्या अधिवेशनात हा स्फोट झाल्याने आणि येशूला धर्मदीक्षा देणाऱ्या या येहोवाचा (याच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये ‘जे’ अक्षर असले तरी उच्चार ‘येहोवा’ असा आहे) इस्रायल आणि तेथील ज्यूंशी थेट संबंध येत असल्याने सध्याच्या इस्रायल – गाझा युद्धाच्या पार्श्वभूमीवरील हा दहशतवादी हल्ला असावा अशी रास्त शंका व्यक्त झाली होती. मात्र, हे तीन स्फोट घडवणाऱ्या व्यक्तीने स्वतः ह्या गुन्ह्याची कबुली देत आपणच हा स्फोट घडविल्याचे काही पुरावे तपास यंत्रणेला सादर केले असल्याने त्यामागे त्याचाच हात असावा असे मानणे भाग आहे. हा पंथ येशू ख्रिस्ताचे तत्त्वज्ञान मानत नाही. ख्रिसमसही साजरा करीत नाही. त्यामुळे त्या रागानेच आपण हे स्फोट घडवल्याचे सदर संशयिताचे म्हणणे आहे. वास्तविक येशू ख्रिस्ताचा जन्म ज्यूवंशीय राजा डेव्हीडच्या वंशात ज्योशुआ म्हणून झाला होता. त्यालायेहोवानेच धर्मदीक्षा दिली. ह्याच येहोवाची आर्क ज्यूंसाठी अत्यंत पवित्र मानली गेली आहे. मोझेसला येहोवा देवाचाच आदेश मिळाला होता व त्यामुळेच त्याने ईजिप्तच्या सायनाय वाळवंटाच्या परिसरात तळ ठोकला व आपल्या अनुयायांना ‘टेन कमांडमेंड्स’ नावाने ओळखले जाणारे दहा आदेश दिले. बायबलचा जुना करार हा ह्या सगळ्या इतिहासामुळेच ज्यूंशी संबंधित आहे. सध्याच्या इस्रायल – गाझा युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही स्फोटमालिका दहशतवादी शक्तींकडून घडवली गेली असण्याची शक्यता ह्या पार्श्वभूमीमुळे व्यक्त झाली. त्यात नुकतीच केरळमध्ये गाझामधील पॅलेस्टिनियन लोकांच्या समर्थनार्थ एक सभा झाली होती व त्यात बोलण्यासाठी थेट ‘हमास’च्या एका नेत्याला ऑनलाइन सहभागी करून घेण्यात आले होते. त्यामुळे ‘जेहोवा’ म्हणजे ज्यू समजून हा दहशतवादी हल्ला चढवला गेला असावा असा प्राथमिक कयास होता. त्यामुळेच केंद्र सरकारने अत्यंत तत्परतेने ह्या घटनेची दखल घेतली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआयए आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या म्हणजे एनएसजीच्या पथकांना घटनास्थळी रवाना केले. मात्र, संशयिताने दिलेल्या कबुलीमुळे ह्यामागे इस्लामी कट्टरपंथीय शक्ती नसून एकेकाळी ह्याच पंथामध्ये वावरलेला व सहा वर्षांपूर्वी त्यातून बाहेर पडलेला एक अनुयायी होता असे स्पष्ट झाल्याने तपासयंत्रणांनीही मोकळा श्वास सोडलेला असेल. मात्र, सध्याची एकूण परिस्थिती लक्षात घेता इस्रायल – गाझा युद्धाचे निमित्त करून इतर देशांमध्ये जे चालले आहे, तसे प्रकार भारतातही होऊ शकतात. त्यामुळे इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेत भारत सरकारने वाढ करणे आवश्यक आहे. रशियातील विमानतळावर उतरलेल्या इस्रायली विमानातील प्रवाशांवर हल्ला चढवण्यासाठी ‘अल्ला हू अकबर’चे नारे देत जमाव कसा घुसला त्याच्या चित्रफिती काल वायरल झाल्याच आहेत. अशा प्रकारच्या झुंडशाहीला आणि घातपाताला भारतात डोके वर काढण्याची संधी मिळता कामा नये. म्हणूनच केरळमध्ये ज्यांनी हमासच्या नेत्यासमवेत सभा घेतली त्यांच्या कुंडल्या केंद्रीय गृहखात्याने मांडणे जरूरी आहे. हमासला अमेरिकेने आणि युरोपीय महासंघाने दहशतवादी संघटना म्हणून कधीच घोषित केलेले आहे. भारतात जरी तिचे अस्तित्व नसल्याने ती दहशतवादी संघटना म्हणून घोषित झालेली नसली, तरीही पॅलेस्टाईनच्या विषयाचे निमित्त करून ती विषवल्ली येथे आणण्याचा प्रयत्न कोणी करणार असेल तर त्यांची नांगी वेळीच ठेचली जाणे आवश्यक आहे. आजवर हमास ही पॅलेस्टाईनची प्रतिनिधी कधीच नव्हती. केवळ गाझामध्ये तिची सत्ता आहे. पॅलेस्टाईनची वेस्ट बँकमधून चालवली जाणारी अधिकृत राजवट ही हमासची राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या फताहची आहे. हमास ही राजकीय बुरखा पांघरलेली अधिक जहाल दहशतवादी संघटना आहे. अशा काट्यांचा नायटा होण्याआधीच त्यांचा बंदोबस्त होणे जरूरीचे असते, नाही तर हे विष समाजात भिनत जाते. केरळमधील सध्याच्या बॉम्बस्फोटमालिकेचे कोडे उकलले असले, तरी ज्या सहजतेने त्या संशयिताने आईडीयुक्त बॉम्ब बनवले ती बाबही चिंताजनक आहे. पूर्वी आखातात फोरमनची नोकरी करणाऱ्या या महाभागाने केवळ इंटरनेटवरून माहिती मिळवून हे बॉम्ब बनवले. त्यासाठी पेट्रोल, फटाके, रिमोट कंट्रोल, बॅटरी अशा घरगुती वापराच्या वस्तूंचा वापर केला. ह्याकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचा प्रभावी वापर करून इंटरनेटवरील अशा विघातक गोष्टींना वेळीच पायबंद घातला पाहिजे. अन्यथा असे बॉम्ब घरोघरी बनायला वेळ लागणार नाही.