मी अनुभवलेला ‘मगो’ पक्ष

0
58
  • विद्या म्हाडगूत

गोवेकरांना गोवा खरंच सुखी- समाधानी पाहायचा असेल तर स्थानिक पक्षांशिवाय पर्याय नाही. राष्ट्रीय पक्षांचे तू-तू मै-मै हे कुठेतरी बंद व्हायला हवे. तरच आपण गोव्यात मुक्त श्‍वास घेऊ शकू. निवडणूक जवळ येते आहे. मतदारांनी योग्य विचार करावा

१९ डिसेंबर १९६१ साली पोर्तुगिजांच्या राजवटीतून गोवा मुक्त झाला आणि मुक्त गोव्यात माझा जन्म झाला. सन १९६२ च्या पहिल्या पंचायतीच्या निवडणुकीत माझे काका श्री. रोहिदास ह. नाईक (माजी आमदार) बांदोडा पंचायतीचे पहिले सरपंच झाले. १९७२ साली काकांनी मगो पक्षाच्या वतीने पहिली निवडणूक लढवली आणि ते निवडणूक जिंकले. तेव्हा माझे वय जेमतेम १० वर्षांचे होते. राजकारण वगैरे कळण्याचे ते वय नव्हते. वाड्यावरील व आमच्या घरातील मोठी माणसं एका पिकअपमधून लाऊड स्पीकर लावून प्रचार करायचे. त्यावेळी आम्ही मुले पण त्यांच्यासोबत असायचो. फोंड्याला पोचल्यावर आम्हाला बटाटेवडे आणि चहा मिळायचा. तेवढ्यावरच सगळे खूश.

आज कोणत्याही पक्षाच्या तिकिटासाठी शर्यती लागलेल्या असतात, तशा त्यावेळी नव्हत्या. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी स्वतःहून काकांना मगो पक्षाचे तिकीट दिले होते. काका निवडणूक जिंकले आणि फोंडा मतदारसंघाचे आमदार होण्याचे भाग्य त्यांना लाभले.

भाऊसाहेब बांदोडकर म्हणजे बहुजन समाजाचे आधारस्तंभ होते. ग्रामीण भागात मगोची हवा होती आणि अजूनही आहे.
निवडणुकीचा प्रचार करताना एक प्रसिद्ध रेकॉर्ड आम्ही ऐकत होतो ती म्हणजे ‘‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…’’ त्या गाण्यातच अशी काही जादू होती की अंगात स्फूर्ती यायची. आम्ही सगळे एका सुरात म्हणायचो. गोव्याची आणि महाराष्ट्राची संस्कृती जवळजवळ सारखीच म्हणायला हरकत नाही. फक्त भाषेचा काय तो फरक!
काका पेशाने शिक्षक होते. शिक्षकी पेशा सांभाळून काकांनी राजकारणात भाग घेतला. कसलीच अपेक्षा न करता निःस्वार्थीपणे काम केले. काकांनी राजकारणात भाग घेतला ते राजकारण अगदी स्वच्छ होते. कुणामध्ये कसलाच स्वार्थ नव्हता. नंतर नंतर ते गढूळ होत गेले आणि काकांनी दोन निवडणुका जिंकून राजकारणातून निवृत्त होऊन शिक्षकी पेशा सांभाळला.

मी अनुभवलेला मगो पक्ष तसाच स्मरणात आहे. कार्यकर्ते म्हणाल तर अगदी जिवाला जीव देणारे. आपलेच काम समजून काकांच्या पाठीशी उभे राहिले. कसलीच अपेक्षा नव्हती. आमच्या घरी कार्यकर्त्यांना चहा, फराळ मिळायचा. जेवणावळी वगैरे त्यावेळी नव्हत्या. सगळेच अगदी मन लावून काम करायचे. काही अपवाद सोडून सगळा गावच काकांच्या पाठीशी उभा होता. काका निवडणूक जिंकल्यावर मोठी मिरवणूक निघाली. काका अगदी गुलालाने माखले होते. कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

जशी जशी मी मोठी होत गेले, तसा राजकारणाचा रंगच बदलला. निःस्वार्थीपणाची जागा स्वार्थाने घेतली. भाऊसाहेबांचं निधन झालं आणि मगो पक्षाला गळती लागायला सुरुवात झाली. काही स्वार्थी माणसं राजकारणात शिरल्यामुळे गोव्यात अशांतता पसरायला लागली. मगो पक्षाची शकले पडायला सुरुवात झाली आणि इकडेच जाती व्यवस्था उदयाला आली. काही स्वार्थी राजकारण्यांनी जातीचे कार्ड बाहेर काढले. भाऊसाहेबांच्या बहुजन समाजाच्या पक्षाने जातीचे राजकारण करायला सुरुवात केली आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कोलांट्या उड्या मारायला सुरुवात केली ते आजपर्यंत.. या घडीलासुद्धा चालू आहे.

खरं तर भाऊसाहेब बांदोडकर स्वतःहून निःस्वार्थी चारित्र्यवान माणसांना हेरून तिकिटे द्यायचे. तिकिटे विकत घेण्याची कुणावर पाळीच येत नव्हती. त्यामुळे राजकारणसुद्धा स्वच्छ असायचे. पण हल्ली तिकिटासाठी जी रस्सीखेच चालू आहे ते पाहून शंका येते की हे गोव्याचं भलं पाहतात की स्वतःचा स्वार्थ?
उमेदवार निवडताना मतदाराने उमेदवाराचे वय, चारित्र्य, गोव्यातील लोकांचं भलं पाहणारा, सुशिक्षित उमेदवार निवडावा. हल्ली विकासाच्या नावाखाली गोव्याची जी अपरिमित हानी झाली आहे ती न भरून येण्यासारखी आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे राजकारणात जातिव्यवस्थेला कुठेच थारा देता कामा नये. जातिव्यवस्था ही खाजगी बाब आहे आणि ती आपल्या सुरक्षिततेसाठी असते. संपूर्ण राज्याचे भले करणे हे सरकारचे काम असते आणि ते भाऊसाहेब बांदोडकरांच्या सरकारने केले होते. गोव्यात सगळ्याच जाती-धर्माचे लोक सुखासमाधानाने नांदत असताना जातीचे राजकारण करणे केव्हाही वाईट.

पूर्वी गोवा गोव्यापुरता मर्यादित होता. पण तशी परिस्थिती आता नाही. परप्रांतीयांनी गोवा काबीज केल्यामुळे ती एक वोटबँक ठरली आहे आणि ते ज्या पक्षाच्या वतीने कौल देतील तेच उमेदवार निवडून येतील यात शंका नाही. भूमिपुत्र कुठेतरी हरवत चालला आहे.

गोवेकरांना गोवा खरंच सुखी- समाधानी पाहायचा असेल तर स्थानिक पक्षांशिवाय पर्याय नाही. राष्ट्रीय पक्षांचे तू-तू मै-मै हे कुठेतरी बंद व्हायला हवे. तरच आपण गोव्यात मुक्त श्‍वास घेऊ शकू. निवडणूक जवळ येते आहे. मतदारांनी योग्य विचार करावा.