मीराबाईला सुवर्णपदक

0
135

मीराबाई चानू हिने महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये ४८ किलोवजनी गटात सुवर्णपदक मिळवून यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. केवळ चार फूट ११ इंच उंचीच्या मीराबाईने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना तब्बल २६ किलोंनी मागे टाकले.

२०१४ सालापर्यंत चानूला केवळ १६५ ते १७० किलोंदरम्यान सातत्याने वजन उचलता येत होते. यानंतर मात्र तिने कमालीची मेहनत घेत आपली क्षमता वाढवली. २०० किलोंचे वजन उचलण्याचे लक्ष्य मीराबाईने ठेवले असून आत्तापर्यंत केवळ २० महिला वेटलिफ्टर्सने २०० किंवा त्यापेक्षा जास्त किलो वजन उचलणे शक्य झाले आहे. मीराबाईने अशीच प्रगती कायम राखल्यास यांग लियांग हिचा २१७ किलोंचा विश्‍वविक्रम धोक्यात येऊ शकतो. मीराबाईने स्नॅच प्रकारात पहिल्या तीन प्रयत्नांत अनुक्रमे ८०, ८४ व ८६ किलो वजन उचलले. ८६ किलो वजन उचलून तिने राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रम नोंदविला. क्लिन अँड जर्कमध्ये १०३ किलो, १०७ किलो व तिसर्‍या प्रयत्नात तब्बल ११० किलो वजन उचलून तिने एकूण (११० + ८६ किलो) १९६ किलोंसह सुवर्णपदक आपल्या नावे करताना आपलाच १९४ किलोंचा विक्रम मोडला. २९ नोव्हेंबर २०१७ रोजी वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पिनशीपमध्ये चानूने हा विक्रम नोंदविला होता. मॉरिशसची मेरी हनित्रा रोयलिया १७० किलोंसह दुसर्‍या तर श्रीलंकेची दिनुशा गोम्स १५५ किलोंसह तिसर्‍या स्थानी राहिली.